जालना - पोलीस यंत्रणेमध्ये अत्यंत महत्त्वाची असलेली एक यंत्रणा म्हणजे सीसीटीएनएस (क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) ही गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यासाठी जुन्या पद्धतीचाच म्हणजे हाताने लिहिण्याचा वापर करावा लागत आहे, याचा परिणाम गुन्हे नोंदविण्यात होत आहे.
महत्त्वाची यंत्रणा
गुन्हा नोंदविण्यासाठी सीसीटीएनएस ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. जिथे गुन्हा नोंदविल्यानंतर हा गुन्हा ऑनलाइन संबंधित पोलीस यंत्रणेला जातो आणि त्याची नोंद योग्य त्या ठिकाणी घेतली जाते. ही सर्व यंत्रणा इंटरनेटच्या माध्यमातून सुरू असते. मात्र सध्या ही यंत्रणाच बंद असल्यामुळे इथे तक्रारी घेऊन येणाऱ्या तक्रारदारांना ताटकळत बसावे लागत आहे. या यंत्रणेवर जो गुन्हा एक तासात नोंद करायचा तो गुन्हा हाताने नोंदविण्यासाठी तीन ते चार तास लागतात. हाताने गुन्हा नोंदविण्याची सवय नसल्यामुळे पोलीस कर्मचारी देखील एवढा मजकूर लिहिण्यासाठी टाळाटाळ करतात. पर्यायाने गुन्हा नोंदविण्यासाठी विलंब होत आहे.
एसीबीचा गुन्हा नोंदविण्यास विलंब
दिनांक 20 मे रोजी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील होते. मात्र ही यंत्रणाच बंद असल्यामुळे उशिरापर्यंत हाताने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आजदेखील ही यंत्रणा सुरू न झाल्याने उर्वरित मजकूर हाताने लिहिणे सुरूच आहे.
जबाबदारीची टोलवाटोलवी
ही यंत्रणा पूर्णतः इंटरनेटवर सुरू असून इथे भारत संचार निगम लिमिटेडचे नेटवर्क आहे. त्यामुळे ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी नेटवर्क पुरवणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार रोज दाखल झालेल्या डाटा रात्री इतरत्र कॉपी करणे आवश्यक आहे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी ही यंत्रणा सक्षमपणे काम करू शकते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणेने हे काम केलेच नाही. त्यामुळे या यंत्रणेवर लोड आला आणि ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे आता हे दोघेही एक दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहेत.
हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा - गोंदियात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; एकाचा मृत्यू