जालना - औरंगाबाद महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर पुन्हा एक विचित्र अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अपघातादरम्यान महावितरण कंपनीचा खांब पडल्याने रात्रीपासून हायपावर उच्चदाब वीजपुरवठा खंडित झाला होता.
जालन्याहून औरंगाबादकडे टेम्पो आणि कार ही वाहने जात होती. वाहन मागे-पुढे घेण्याच्या कारणावरून या दोन्ही वाहन चालकांची शाब्दिक चकमक झाली. त्यांच्यात सुरू असलेली शाब्दिक चकमक ही ट्रेलर चालकाने पाहिली आणि आपले वाहन रस्त्याच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रेलर विजेच्या खांबाला जाऊन धडकला.
हेही वाचा - ग्रहण ग्रहण सूर्यग्रहण..! विद्यार्थ्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद
याच वेळी ट्रेलरच्या डाव्या बाजूने रॉयल चिंतामणी ही नागपूरवरून पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स येत होती. सळ्या भरलेला ट्रेलर हा रस्त्याच्या खाली जात आहे हे ट्रॅव्हल्स चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यानेही बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका शेडमध्ये ही बस घुसली. यामध्ये बसचे नुकसान झाले मात्र, प्रवाशांना इजा झालेली नाही. या विचित्र अपघाताची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बदनापूर पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.