जालना : Bus Accident : नागपूर पुणे महामार्गावर खासगी बस पुलावरुन कोसळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाले, यात चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नागपूर पुणे महामार्गावर बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली.
पुलावरुन कोसळली खासगी : पुण्यावरुन नागपूरच्या दिशेनं निघालेली खासगी बस ( क्रमांक एस एच 40, सीएम 6969 ) ही छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर भरधाव जात होती. यावेळी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मात्रेवाडी परिसरातील पुलावरुन खाली कोसळली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. सुदैवानं या अपघातात अद्याप जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातातील 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातात जखमी झालेले प्रवासी : पुण्यावरुन नागपूरला निघालेल्या खासगी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी बसलेले होते. मात्र या बसचा अपघात झाल्यानं यात 25 प्रवाशांना जबर मार लागला. यातील चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना जालना इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात अमन कुमार (19 मध्यप्रदेश), अनिता इंगोले (35), शाहबाज खान, रवींद्र राजे (33), रितेश चंदेल (23), पराग शिंगणे (42 नागपूर), निकेल मानिजे (23 वर्धा), किरण मांटुळे (38 यवतमाळ), संभाजी सासणे (32 यवतमाळ), मधुकर पोहरे (40 अमरावती), गणेश भिसे (37 यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (30 ), सागर उपाय्या (19 मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (40 यवतमाळ), शुभम हत्तीमारे (27 गोंदिया) या 15 जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव, डॉ. अनुराधा जाधव व त्यांची टीम उपचार करत आहे. तर इतर प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनास्थळी धावले पोलीस : मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास खासगी बस पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात 25 प्रवासी जखमी झाल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बचावकार्य करत प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचं साहित्य बसमध्ये आहे. त्या साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी अपघातस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भगवात यांनी दिली. पोलीस पथकात हवालदार गोविंद डोभाळ, प्रताप जोनवाल, जऱ्हाड, चालक ठाकूर, महिला पोलीस कर्मचारी जया नागरे यांचा समावेश आहे.
हेही वाचा :