जालना- भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या केल्या. पारधसह परिसरातील धामणगाव, मढ धाड येथे सुद्धा चोरट्यांनी लाखो रूपयाचा माल चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, पारध बुद्रुक येथे बुधवारी घरफोडया झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. ही माहीती मिळताच पारध पोलीस आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर परिसर पिंजून काढला.
पारध बुद्रूक येथे बुधवारी रात्री 12 ते 1:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी चार घर फोडून काही रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी चोरी केली. तसेच एका वृद्ध महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. विश्वास भास्करराव लोखंडे, सुभाष श्रीराम लोखंडे,सुनील गणेश लोखंडे आणि अशोक शिवराम लोखंडे या चार जणांच्या घरून अंदाजे 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहे. याबाबत चारही ग्रामस्थांनी पारध पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा- कोरोनाबाबतचे नियम पायदळी तुडवणे पडले महागात, तीन हॉटेल्सविरोधात गुन्हा दाखल
चोरटयांनी विदर्भातून वळवला मराठवाड्यात मोर्चा
पारध येथून दोन किलो मीटर असलेल्या विदर्भातील बुलढाणा जिह्यातील धामणगाव सह धाड, मढ, सावळी आदी गावात चोरटयांनी धुमाकूळ घातलेला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात धाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, उप निरीक्षक इंगळे आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. तेव्हाच जालना जिल्ह्यातील पारध बुद्रुक येथे चोरटयांनी घरफोडी केल्याची माहीती मिळाली. ही माहीती मिळताच पारधचे पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी धाड पोलिसांच्या आणि धामणगाव येथील ग्राम सुरक्षा दलाच्या पंधरा स्वयंसेवकांच्या सहकार्याने घटनास्थळ गाठले. त्यानंतर संपूर्ण पारध परिसर पिंजून काढला मात्र तीनतास शोध मोहीम राबवून सुद्धा चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले.
हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...