जालना - अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणणे ही पक्षाची शिस्त नाही. नुकत्याच झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवड यादीमध्ये बबनराव लोणीकर यांनी सुचवलेल्या कार्यकर्त्यांची देखील नियुक्ती झालेली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित तसे झाले नसेल तर त्यांनी आपली नाराजी प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी. आपण मात्र त्यांना आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांना विचारात घेऊनच निवड यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली होती. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच ही यादी आपण जाहीर केली, असे स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिले आहे.
काल (२ सप्टेंबर) माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि त्यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांनी जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेतली व स्वतःहून काही कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामुळे भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी त्याच व्यासपीठावर आमदार संतोष दानवे यांनी आमदार नारायण कुचे, भास्कर दानवे, सिद्धिविनायक मुळे, राजेश राऊत यांच्या उपस्थितीमध्ये निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
काल आणि आज झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांमुळे सामान्य कार्यकर्ता मात्र गोंधळून गेला आहे. काल झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीशिवाय नियुक्त्या झाल्या असल्याचे बोलले जात आहे. तर, आज झालेल्या नियुक्त्या या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या परवानगीने केलेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पक्षाच्या विरोधात ज्यांची नाराजी असेल त्यांनी वरिष्ठांकडे बोलावे. तसेच, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणणे ही पक्षाची शिस्त नाही, असा टोलाही आमदार दानवे यांनी लोणीकर पिता-पुत्रांना लगावला आहे.
हेही वाचा- भाजपचा वाद चव्हाट्यावर; नाराज कार्यकर्त्यांच्या राहुल लोणीकरांनी केल्या नियुक्त्या