जालना - बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेतंर्गत येणाऱ्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकांचे वेतन सांगणारे फलक लावले आहे. विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण क्षेत्रावर शासन खर्च करत असलेल्या पैशांची जाणीव व्हावी आणि महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थिती वाढावी, यासाठी हे फलक लावण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिसरात मात्र प्राध्यापकांच्या पगारावर चांगलीच चर्चा रंगत आहे.
बदनापूर येथे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती फार कमी असते. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी ही शक्कल लढवली आहे. शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाचा एक तक्ता तयार करून त्याखाली 'विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा' अशी टीप लिहलेले फलक महाविद्यालयात लावले आहेत.
हेही वाचा - रस्त्यावरची धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
दरम्यान, महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना संस्थेने नियमबाह्य काम केल्याचे कारण देत निलंबित केले आहे. या प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हे फलक लावण्यामागे वादग्रस्त कारणे असल्याचेही बोलले जात आहे. एकंदरीत या फलकांमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.