जालना -सध्या जालना जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कलह ठासून भरलेला आहे. मात्र, हा कलह नसून ते कर्तत्व दाखविण्यासाठी लढत आहेत, असे अजब वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते किशोर शितोळे यांनी केले आहे.
विरोधक गैरसमज पसरवत आहेत
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अभ्यास न करताच विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र, मोदी सरकारने सामान्य जनतेच्या आणि राष्ट्रीय विकासाच्या कामाचा आढावा घेऊन हा अर्थसंकल्प जनतेसमोर ठेवला आहे. आणि त्या तरतुदी सामान्य माणसाला कळव्यात हा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.
ही तर कर्तृत्व दाखविण्याची लढत
जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडले आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांचा गट आणि माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचा दुसरा गट. वेगवेगळ्या बैठकांसाठी जिल्ह्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांची पळवा पळवी करण्यासारखे प्रकार होताना दिसतात. दानवे आणि लोणीकर यांच्यासारखी माणसे भाजपला मिळाली हे भाग्यच आहे. आपले काम दाखवण्यासाठी आणि आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही भाऊ लढत असल्याचे अजब व्यक्तव्य शितोळे यांनी केले