जालना - भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी आज उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. मंगळवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकावर जिल्ह्यातील स्वतःसह 30 पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. काही वेळातच सोशल मीडियावर याविषयी नाराजीचे सूर उमटले. याबाबत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे कार्यकर्ते पुढे होते. त्यामुळे जास्त सूर घनसावंगी मंठा आणि परतूर तालुक्यातून उमटले. साहजिकच हे तिन्ही तालुके माजी पाणीपुरवठा मंत्री तथा परतूर-मंठाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या पारड्यातील आहेत. आता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांच्या गळ्यात माळ पडल्यामुळे त्यांचेही वजन वाढले आहे.
परंतु, जिल्हाध्यक्ष आमदार दानवे यांनी केलेल्या नियुक्त्यांबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर ज्या 30 कार्यकर्त्यांची निवड दानवे यांनी केली, त्या निवड झालेल्या काही महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील योग्य पद न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर आहे. नाराजी आज लोणीकर यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त झाली. भाजप संभाजीनगर कार्यालयात जिल्ह्यातील नाराज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बंद खोलीमध्ये मात्र सर्वांसमक्ष उघड अशी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबत भाजप कार्यालयावर खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावाचा असलेला फलक देखील काढून टाकण्याची शेवटच्या टोकाची भाषा वापरण्यात आली.
खरेतर यामध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत, यापूर्वी दुसऱ्या पक्षात थारा मिळत नाही म्हणून भाजपमध्ये आलेले आहेत. आशा कार्यकर्त्यांना खासदार रावसाहेब दानवे जिल्हाध्यक्ष असताना मदत केली गेली नाही. कारण यांच्या वर्तणुकीबद्दल सर्वत्र नाराजी होती. असे कार्यकर्ते पक्षाच्या बैठकीला येत असल्यामुळे अनेक 'इज्जतदार' कार्यकर्त्यांनी बैठकीला येणे सोडून दिले होते. त्याच वेळी हा प्रश्न भाजपच्या पदाधिकार्यांना विचारला असता आम्ही त्यांना बोलवत नाही, मात्र तेच बैठकांना येतात, असे उत्तर मिळाले होते. आज या बैठकीला त्या कार्यकर्त्यांपैकी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांना पदेही मिळाली आहेत.
हेही वाचा - 'ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज'
यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ आहोत. कामे करीत आहोत मात्र काल झालेली कार्यकर्त्यांची निवड ही चुकीची आणि एकतर्फी आहे. याबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहोत. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी लगेच दुसरी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये नाराज असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. यामध्ये महिला मोर्चा, युवामोर्चा, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, अशा विविध पदांच्या नियुक्त केल्या आहेत. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत मात्र काही वैचारिक मतभेद असल्यामुळे आणि आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून आम्हीदेखील देखील या नियुक्त्या करीत असल्याचे राहुल लोणीकर यांनी सांगितले. दरम्यान, आत्तापर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात असलेल्या भाजपात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.