जालना- भोकरदान तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही कारावाई काल मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी कारवाईत ६ ट्रॅक्टरसह ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसानी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काल रात्री भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना खापरखेडा, जवखेडा व लिंगेवाडी शिवारात काही लोक ट्रॅक्टरच्या सहायाने अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चौधरी यांनी एक पथक तयार करून सदर ठिकाणांवर रवाना केले. पथकाला मौजे, खापरखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या उत्खनन करून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर दिसून आले. पोलिसांनी हे ३ ट्रॅक्टर पकडले असून जवखेडा शिवारातून २ ट्रॅक्टर, लिंगेवाडी येथील एक ट्रॅक्टर असे मिळून एकून ६ ट्रॅक्टरांसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. मिलिंद सुरडकर, जे.ए जाधव, पोकॉ.एस.आर. जगताप, पो.कॉ ए.के जोशी यांनी केली आहे.
हेही वाचा- जालन्यात सुरू होणार कोरोना विशेष रुग्णालय.... रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात