जालना - जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात सोमवार दि 21ला सकाळी 7 पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुरूवातीला अत्यंत धिम्या गतीने मतदान झाले. सकाळ पासूनच पावसाचे वातावरण असल्याने सुरूवातीला मतदार मतदानासाठी घराबाहेर पडला नाही. मात्र, नंतर हळूहळू वातावरणात बदल झाला व नंतर मतदार प्रक्रियेला वेग आला. दरम्यान, सायंकाळी 05 वाजेपर्यंत 65.91 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगितले गेले.
भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 5 हजार 534 एवढी मतदार संख्या असून त्यात पुरूष मतदार संख्या ही 1 लाख 60 हजार 756 एवढी आहे. महिला मतदारांची संख्या ही 1 लाख 44 हजार 778 एवढी आहे. मतदारसंघात एकूण 322 मतदान केंद्रे असून त्यापैकी 31 मतदान केंद्र शहरी भागात आहेत. भोकरदन तालुक्यात 177 तर जाफ्राबाद तालुक्यात 145 मतदान केंद्र आहेत.
दरम्यान, भोकरदन येथे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह आपल्या कुटुंबाबरोबर नवे भोकरदन भागातील जिल्हा परीषद शाळेत मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जुनी बाजारपट्टी भागातील जिल्हा परीषद कन्या शाळेत मतदान केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिपक बोराडे यांनी जाफ्राबाद तालुक्यातील गोंधनखेडा मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपार नंतर मतदार मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने जवळपास 70 टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात सुरूवातीला भाजपाला एकतर्फी वाटणारी निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांनी ही चांगलीच मुसंडी मारल्याची चर्चा होत असल्याने कोण निवडून येईल यासाठी 24 तारखेचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेही मतदारसंघात चांगलीच हवा केल्याने ते किती व कोणाचे मतदान घेतात यावरही बरेचसे विजयाचे गणित अवलंबून राहणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.