जालना- प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याची दखल घेऊन शासनाने या दोन्ही वस्तूंवर बंदी आणली आहे. त्यामुळे घरगुती छोटेखानी कार्यक्रम करणाऱ्या नागरिकांची मात्र अडचण झाली आहे. घरच्या घरी सुख दुःखाचा कार्यक्रम करण्यासाठी भांडे आणायची तर कुठून? आणि किती? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. या प्रश्नावर जालन्यातील डॉ.स्वाती कुलकर्णी यांनी उपाय शोधला असून त्यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बर्तन बँकेची सुरुवात केली आहे. असा उपक्रम सुरू होण्याची बहुदा ही मराठवाड्यातील पहिलीच वेळ असावी.
डॉ. स्वाती यांची चैतन्य पुनर्वसन केंद्र या नावाने गेल्या २५ वर्षांपासून संस्था सुरू आहे. दसऱ्याला या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि त्यानिमित्त समाजाचे काही देणे लागते या भावनेतून आणि प्लास्टिक थर्माकोल बंदीमुळे सामान्य जनतेची होत असलेली घुसमट पाहून त्यांनी ही बँक सुरू केली आहे. एखाद्याच्या घरी शुभकार्य असेल, दुःखाचे कार्य असेल तर शंभर पाहुणे घरच्या घरी जमतात. मात्र या सर्वांची जेवणाची व्यवस्था करायची कशी? असा प्रश्न आता थर्माकॉल बंदीमुळे निर्माण झाला आहे.
एवढे ताट, तांबे, ग्लास, वाट्या, कोठून आणायचे. एका दिवसासाठी नवे घेणे परवडत नाही. आणि घरामध्ये एवढ्या वस्तू नसतात. अशा दोन्ही कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना आता पर्याय उपलब्ध झाला आहे. डॉ.स्वाती यांनी सुमारे शंभर व्यक्तींना पुरतील अशा पद्धतीने ताट, ग्लास, वाट्या, तांबे, चमचे, अशा प्रकारची लागणारी भांडी गरजूंना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. कुठलेही शुल्क न आकारता वापरा आणि आणून द्या, अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे.
हेही वाचा- जालन्यात पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थिनींचा पुढाकार
परंतु भांडे घेऊन गेलेले व्यक्ती ती भांडे परत आणून देतीलच याची शाश्वती नसल्यामुळे गरजूंकडून अडीच हजार रुपये अनामत रक्कम ठेवून घेतल्या जाते. भांडे परत आणल्यानंतर ती पूर्ण रक्कम त्यांना परत केली जाणार आहे. त्यामुळे आता एखाद्याच्या घरी सुख दुःखाचा कार्यक्रम असेल तर पाहुण्यांसाठी जेवणाच्या भांड्याची काळजी करण्याचे कारण राहिले नाही. प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपक्रमात सहभागी झाले आहेत.