जालना - बदनापूर तालुक्यातील कडेगाव शिवारात अफूचे पीक घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन कारवाई करत सुमारे २० लाख रुपयांचे अफूचे पीक जप्त केले आहे. कांद्याच्या पिकामध्ये अंतर्गत पीक म्हणून अफूचे उत्पादन घेतल्याचा प्रकार या ठिकाणी आढळून आला.
बदनापूर तालुक्यातील कडेगाव शिवारतल्या कांदा पिकामध्ये अफू पिकाची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी आज(गुरुवारी) पहाटे तीन वाजताच्या सुमारास अफूचे उत्पादन घेत असलेल्या स्थळावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी कांद्यामध्ये अफूची रोपे आढळून आली. पोलिसांनी कारवाई करत सुमारे वीस लाखांचे अफूचे पीक जप्त केले आहे.
या प्रकरणातील ही अफूची शेती कोणाची आहे? आणि अशा प्रकारे किती प्रमाणात अफूचे पीक घेतले जात होते? याविषयीची अधिक माहिती बदनापूर पोलीस जाणून घेत आहेत. तसेच या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच जाफराबाद तालुक्यातील एका शेतात अफूचे पीक घेणाऱ्या चार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अकरा लाखांचे अफूचे पीक पोलिसांनी जप्त केले होते. अवघ्या दोन दिवसातच ही दुसरी घटना असून रक्कमही मोठी आहे.
अहमदनगरमध्येही 10 दिवसांपूर्वी अफू शेतीवर छापा-
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली होती. ही गुप्त माहिती जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथकासह 25 फेब्रुवारीला छापा टाकला असता १ लाख ७० हजार रुपये किमतीचे ५६ किलो वजनाची अफूची झाडे पोलिसांनी जप्त केले. आरोपी विरूद्ध अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.