बदनापूर (जालना) - जून महिन्याच्या सुरवातीपासूनच तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सर्वात मोठा सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्पात पाच वर्षानंतर पहिल्यांदा मोठा पाणीसाठा जमा झाला. या जलसाठ्याचे जलपूजन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले.
बदनापूर तालुक्यात यंदा निसर्गाची चांगलीच कृपा आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला. चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात १३ फूट पाणी आले असून मागील पाच वर्षानंतर पहिल्यांदाच या धरणात एवढा जलसाठा जमा झाला आहे. सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प १९६५ मध्ये ८१ लाख रुपये खर्च करून झाले असून या प्रकल्पाचे उदघाटन तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांच्या हस्ते झालेले आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र २४८ चौरस कि.मी. आहे १९६२ मध्ये धरणाच्या बांधकामास सुरवात होऊन सदर काम तीन वर्षात पूर्ण झाले होते. धरणाची उंची १७.६८ फूट आहे ते एकूण पाणी साठा १५.३९ द.ल.घन मीटर आहे तर पाणलोट क्षेत्र २४८ चौरस किलो मीटर आहे.
तालुक्याचा वार्षिक सरासरी पाऊस ६५१ मिली मीटर असून १३ द.ल.घ.मी व १५.३९ द.ल.घ.मी. आहे तर लांबी ८ किलो मीटर आहे. या धरणाखाली समादेश क्षेत्र ५ हजार ७०८ हेक्तर तर लागवडी ५ हजार २८३ हेक्टर असून सिंचन योग्य क्षेत्र ३ हजार ४०१ हेक्टर आहे. त्यामुळे सोमठाणा धरणाचा फायदा शेतकऱ्यांना यंदा होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. कालव्याद्वारे पाणी येण्याची शक्यता आहे.
पाच वर्षानंतर धरणात मोठ्या प्रमाणात उपयुक्त जलसाठा झाल्यामुळे आज रविवारी (दि.१६ ऑगस्ट) आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी बद्रीनाथ पठाडे, अनिल कोलते, वंसत जगताप, पदमाकर जऱ्हाड, दत्ता पाटील, गणेश कोल्हे, सत्यनारायण गिल्डा, विलास जऱ्हाड, जगन्नाथ बारगाजे, कल्याण काळे, दत्तू लहाने, सूरेश लहाणे, बबन कान्हेरे, भगवान कोल्हे, सुरेश शिंदे, भगवान कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.