बदनापूर (जालना) - कोरोना संकटामुळे गोर गरिबांचे हाल होत असताना काही स्वस्त धान्य दुकानदार मात्र पुरेपूर फायदा उचलत असून गोर गरिबांना धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करीत असून बदनापूर
शहरातून एका वाहनाने औरंगाबादला जात असलेला रेशन दुकानातील 18 क्विंटल तांदूळ पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर व कर्मचाऱ्यांनी 12 एप्रिलला रात्री पकडला. मात्र, पुरवठा विभागाने आपली जबाबदारी झटकल्याने 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 3 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जात असून स्वस्त धान्य दुकानातून गोर गरिबांना 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ वाटपाचे आदेश शासनाने दिलेले आहेत. मात्र, बदनापूर तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने 70 रुपये किलो दराने धान्य विक्री करीत आहे. त्यात देखील शासनाने कार्ड धारकांना मान्य केलेले धान्य न देता कमी दिले जाते व उर्वरित धान्य काळ्या बाजारात विक्री केली जाते.
पोलीस कर्मचारी मनोज निकम यांच्या तक्रारीवरून 13 एप्रिलला रात्री 10 वाजता रेशन दुकानाचे 18 क्विंटल तांदूळ एका वाहनातून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात होते. शेख सुभान, शेख इरफान (रा. कटकटगेट औरंगाबाद) व सय्यद शाहीद (रा. बदनापूर) या तिघांविरुद्ध कलम 188,269,34 व कलम 51 राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 , 3 व 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.
धान्य शासकीय, पण..
पोलिसांनी बदनापूरहून औरंगाबादला जाणारे स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ पकडल्याने पुरवठा विभागाची मोठी अडचण झाली. पुरवठा विभागाने हात झटकत सदर धान्य शासकीय आहे, परंतु बदनापूर तालुक्यातील नाही, असा जावई शोध स्वतःच लावून घेतला व पोलिसांनी आपल्यास्तरावर कारवाई करावी असे काळविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
वाहनावर परवाना
बदनापूर शहरातून स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ घेऊन जाणाऱ्या 'छोटा हत्ती' वाहनावर जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचा औरंगाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयाचा परवाना देखील चिटकवून ठेवलेला आहे. याच वाहनातून रेशन दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होता.
मोठी साखळी
बदनापूर शहरासह तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार गोर गरिबांना अन्न धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करतात आणि या कामासाठी बदनापूर शहरातील काहीजण सक्रिय असून सदर मंडळी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य खरेदी करून औरंगाबाद शहरात पाठवितात,पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास अनेकजण यामध्ये अडकण्याची शक्यता आहे.