जालना - एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असा थरार रात्री मोतीबाग परिसरात घडला. तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी नियुक्त केलेला भरारी पथकाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नशीब बलवत्तर म्हणून या पथकातील चारही कर्मचारी वाचले आहेत.
अशी घडली घटना
शासनाच्या 3 जानेवारी, 2018 च्या वाळू निर्मिती धोरणानुसार गौण खनिजाचे होत असलेले अवैध उत्खनन व वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी अपर तहसीलदार शितल बंडगर व नायब तहसीलदार धनश्री भालचिम यांच्या आधिपत्याखाली भरारी पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार रोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे पथक गस्त घालत असते. आज मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास या भरारी पथकाचे प्रमुख मंडळ अधिकारी विश्वास भोरे, मंडलाधिकारी हरी गिरी, आय. बी. सरोदे आणि दुर्गेश गिरी हे चार जण अवैध वाळूवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत होते. जालना शहरातून गांधीचमन मार्गे हे पथक औरंगाबाद चौफुलीकडे गेले आणि तेथून परत वळून अंबड चौफुलीकडे येत होते. त्यावेळी या पथकाला वाळूने भरलेली एक मालमोटार तहसील कार्यालयाकडून मोतीबागकडे जात असताना दिसली. त्याचवेळी या पथकानेही त्यांची खासगी चारचाकी मोटारीने (एम एच 20 डी व्ही 4329) हे त्या मालमोटारीचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी (एम एच 14 डब्लू 5348) त्या अधिकाऱ्यांच्या मोटारीचा पाठलाग करत होती. दरम्यान, वाळूने भरलेली मालमोटार मोतीबाग जवळील पुलाच्या खाली उतरताच अधिकाऱ्यांनी आपली मोटारी मालमोटारीच्या समोर घेतली. तेवढ्यात पाठीमागून पाठलाग करत असलेली मोटार पुढे आली आणि मालमोटार चालकाला काहीतरी सांगून पुढे निघून गेली. ती पुढे जाताच त्या मालमोटार चालकाने या अधिकाऱ्यांच्या गाडीला पाठीमागून ठोस देऊन रस्त्याच्या खाली घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मोतीबाग जवळील कठडे मजबूत असल्यामुळे अधिकार्यांची मोटार या कठड्याला धडकली. एवढेच नव्हे तर या मोटारीला पाच मीटर अंतर पुढे ठोस दिली असती तर हे चारही अधिकारी वाहनासह मोती बागेच्या तलावात गेले असते. दरम्यान, हा सर्व प्रकार झाल्यानंतर पूर्वी भेटलेल्या त्या पांढऱ्या चारचाकीतील तरुण गणेश ज्ञानेश्वर काकडे याने या चारही अधिकाऱ्यांना "आता वाचला पण पुन्हा वाचणार नाहीत", अशी धमकी दिली. दरम्यान, अशा भयभीत परिस्थितीमध्ये या चारही अधिकाऱ्यांनी तहसीलदार व कदीम जालना पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. त्यावेळी ताबडतोब पोलीस व तहसीलदार दोघांनीही घटनास्थळी जाऊन या अधिकाऱ्यांना धीर दिला.
तक्रार दाखल
या प्रकरणी मंडळ अधिकारी विश्वास नागनाथराव मोरे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश काकडे याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
...म्हणून खासगी वाहनातून पाठलाग
रात्रीच्या वेळी सरकारी वाहनातून पाठलाग करत असताना किंवा गस्त घालत असताना ते वाहन ओळखू येते व आरोपी फरार होतात. त्यामुळे सरकारी वाहन न वापरता खासगी वाहन वापरण्यात आले, अशी माहिती मंडळ अधिकारी विश्वास भोरे यांनी तक्रारीमध्ये नमूद केली आहे.
हेही वाचा - बेवारस वाहनांचा जालना पोलीस करणार लिलाव
हेही वाचा - मृताच्या नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड