जालना - नाट्य कलावंतांनी दिलेल्या 69 रुपयांच्या देणगीतून नंदापूर येथे असलेल्या नंदादेवीच्या पुरातन मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील नंदापूर गावाला हे नाव त्या गावात असलेल्या देवीच्या पुरातन मंदिरावरून पडले आहे. गावच्या उत्तर दिशेला नंदादेवीचे पुरातन मंदिर होते. एका छोट्याशा टेकडीवर कच्चा बांधकामांमध्ये आणि एकच भक्त आतमध्ये जाईल, अशा पुरातन पद्धतीने कौलारू हे मंदिर होते.
गाव पुरातन असल्यामुळे आजही येथे गर्भश्रीमंत ग्रामस्थांचे मोठमोठे चिरेबंदीवाडे पाहायला मिळतात. गर्भश्रीमंतीमुळे कलाकारांची दखल घेणाऱ्यांची या ठिकाणी कमी नाही. सर्वच समाजातील लोक येथे वास्तव्य करतात. नवरात्रीच्या काळात टेकडीवर असलेल्या या मंदिरासमोर जत्रा भरते. या जत्रेत आलेल्या पंचक्रोशीतील भाविकांचे मनोरंजन करण्यासाठी व त्यांना संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी नाट्य कलावंतांनी याठिकाणी नाटकाचे आयोजन करायला त्या काळी सुरुवात केली.
हेही वाचा - शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे - अमर हबीब
दिवसेंदिवस या नाटकांची लोकप्रियता वाढत गेली. वीस वर्षांपूर्वी एका नाटकातून मिळालेल्या 69 रुपयांचे वाटप न करता ही रक्कम मंदिराच्या पायाभरणीसाठी अर्पण करण्याचा निश्चय कलावंतांनी घेतला. त्यानंतर पुढील चार-पाच वर्ष हे नाट्यप्रयोग चालू राहिले. नाट्यप्रेमींकडून बक्षीस मिळालेली रक्कम त्याचसोबत दानशूर व्यक्तींनी मंदिराच्या कामाला केलेली सढळ हाताने मदत यामधून सुमारे वीस लक्ष रुपये जमा झाले. या निधीतून एका छोट्याशा टेकडीवर उभे असलेले छोटेसे मंदिर आज भव्य दिव्य प्रांगणामध्ये उभे आहे.
हेही वाचा -आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा
जमिनीपासून सुमारे पंधरा फूट उंचीवर नंदादेवीचा तांदळा आहे. त्याच्यावर उंच असलेला कळस परिसरातील भाविकांना देवीचे अस्तित्व दाखवत आहे. देवीच्या दर्शनाला जाण्यासाठीच्या पायऱ्या चढण्यापूर्वी होमकुंडाचे दर्शन घेऊन वर चढावे लागते. होमकुंडच्या एका बाजूला दीपमाळ तर दुसर्या बाजूला देवीचे मंदिर आहे.