जालना - शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर घाणेवाडी हे छोटेसे गाव आहे. या गावाजवळच तलाव असल्यामुळे या तलावाला घाणेवाडी असे नाव पडले. कालांतराने जालना नगरपालिकेच्यावतीने या तलावाला 'संत गाडगे महाराज तलाव' असे नाव देण्यात आले. गेल्या वर्षी हा तलाव कोरडा पडल्यामुळे समृद्धी महामार्गासाठी या तलावातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे तलावांमध्ये हे मोठमोठे खड्डे होऊन जलसंचय वाढला आहे. असे असले तरीही हा तलाव बांधल्यापासून आत्तापर्यंत एकदाही याची स्वच्छता केली गेली नाही.
तलावाच्या काठावर मोठमोठी झाडे वाढली आहेत. यासंदर्भात घाणेवाडी जलसंरक्षण समितीचे सदस्य सुनील रायठठ्ठा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या झाडांपासून तलावाला धोका असल्याचेही म्हटले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यानंतर ही झाडे आजही वाढतच आहेत.
सध्याच्या परिस्थितीत या तलावातील पाणी हे पूर्णपणे नवीन जालन्यातील नागरिकांसाठी वापरले जाते. गेल्या आठ दिवसांपासून राजूर भागात पडलेल्या पावसामुळे या तलावात आता मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. सध्या तलावात साडे पंधरा फूट खोल भागात जवळपास 8 लाख 50 हजार दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी नवीन जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शहरापासून जवळच हा तलाव आहे. सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका या तलावाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे हा परिसर अत्यंत रमणीय आणि शांत असल्याचा अनुभव येतो. यामुळे सायंकाळी विरंगुळा म्हणून शहरवासी येथे फिरण्यासाठी येतात.
- तलावाचे आणखी एक वैशिष्ट्य -
हा तलाव निजाम काळात बांधण्यात आला. तेव्हापासून जालना शहराकडे असलेल्या उतारामुळे कोणत्याही विद्युतपंप शिवाय हे पाणी जालना शहराकडे येत आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेचा वीजबीलावरील मोठा खर्च वाचला आहे.
- 'संत गाडगे महाराज' तलावाचा इतिहास -
हैदराबाद राज्याच्या निजामाने 1930 मध्ये या तलावाच्या बांधकामाला सुरुवात केली. यानंतर 1935 मध्ये तलावाचे बांधकाम पूर्ण झाले. कुंडलिका नदीवर हा तलाव बांधण्यात आला आहे. त्याची लांबी 836 मीटर तर उंची 15 मीटर आहे. बांधकाम झाले त्यावेळी याची क्षमता 51 टीएमसी जलसाठा इतकी होती. यानंतर पिण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली.
हा तलाव जालना तालुक्यात आहे. यामधील पाण्याचा वापर जालना नगरपालिका करत असल्यामुळे याची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी जालना नगरपालिकेकडे आहे. 1960 ला दिवसातून दोन वेळा, 1970 ला दिवसातून एक वेळा, 1990 ला एक दिवसाआड, सन 2000 मध्ये आठ दिवसाआड, त्यानंतर जसे जमेल तसे पंधरा दिवसाला, महिन्याला आणि गेल्या आठ वर्षांपासून आठ दिवसाआड नवीन जालना शहरवासियांना पाणी मिळत आहे.
सन 2010 मध्ये शहरातील उद्योगपती आणि विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन घाणेवाडी जलसंरक्षण मंचाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून तलावातून 2010 मध्ये 45 हजार, 2011 मध्ये 40 हजार, 2012 मध्ये 36 हजार, 2013 मध्ये 40 हजार, 2015 मध्ये 40 हजार, ट्रॅक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे.