जालना - उद्यापासून कोरोनाच्या प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, नियोजित ठरलेल्या ठिकाणांपैकी घट झाली असून आता फक्त चार ठिकाणीच उद्या लसीकरण होणार आहे. तर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये लसीकरणाचा ड्रायरन झाला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे लसीकरण आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका खाली इमारतीमध्ये होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संपर्क -
जालना जिल्ह्यात उद्या चार ठिकाणी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी नऊ वाजता या लसीकरणाला सुरुवात होईल. तसेच या लसीकरणा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार येथे सर्व यंत्रणा काम करत आहे.
इमारत बदलली -
ज्या इमारतीमध्ये ड्रायरन झाला होता, ती इमारतसोडून दुसऱ्या इमारतीमध्ये हे लसीकरण होणार आहे. लाभार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली असेल आणि तो गैरहजर असेल तर त्याला तीन वेळा संधी दिली जाणार आहे. त्यानंतरदेखील तो आला नाही, तर त्याला लस घेण्याची इच्छा नाही, असे ग्राह्य धरून त्याचे नाव बाद केल्या जाणार आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयात तीन कक्ष तयार करण्यात आले आहेत. पहिल्या कक्षात प्रतीक्षालय, दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस देणे आणि तिसऱ्या कक्षात व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - सर्व पक्ष व धर्म यांच्यापलीकडे राष्ट्रमंदिरासाठी अभियान सुरू - साध्वी ऋतंभरा