जालना - मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी मराठा संघटनाकडून ठीकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्याच प्रमाणे आज जालना शहरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावरून परतणारे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आरोग्यमंत्र्यांना हा घेराव घालण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी घोषणाबाजीही झाली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख अशोक पडुळ, सुभाष चव्हाण, यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा घेराव घातला होता.
आज सकाळी नऊ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुक्तीस्तंभाजवळ पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी सह जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपून पालकमंत्री टोपे परत जात असतानाच वरील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालून घोषणाबाजीला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या कार्यक्रमामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.