जालना - शहरात सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी आपचे कार्यकर्ते संजोग हिवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, या खाजगी शाळांच्या विरोधात आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचे ते म्हणाले.
आम आदमी पक्षाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजोग हिवाळे यांनी माहिती दिली. 'फी रेग्युलेशन अॅक्ट २०११ नुसार शाळांनी शुल्क वाढ करताना पालक समन्वय समितीच्या वतीने ठराव घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवायला हवा. त्यासाठी ऑडिट रिपोर्ट, अकाउंटिंग बॅलन्स, या सर्व बाबीं पूर्ण करून शिक्षण विस्तार अधिकारी यांनी अहवाल वरिष्ठांना सादर करायला हवा. मात्र, तसे न होता शुल्क वाढीचा कायदा तर लांबच राहिला; उलट, वेळेवर शुल्क न भरल्यास दर आठवड्याला दोनशे रुपयांचा दंड आकारला जातो. या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभाग सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. तसेच शहरातील माय रिच डॅड अकॅडमी ही शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्यात शाळेतून किंवा ते सांगतील तेथूनच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव आणतात. त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला जातो,' असे आरोप त्यांनी केले. 'या शाळेत विद्यार्थ्यांना दोन वर्षासाठी १ लाख ३५ हजारापर्यंत शुल्क मोजावे लागते. त्यामुळे सामान्य माणूस कंगाल झाला आहे,' असेही ते यावेळी म्हणाले .
यासंदर्भात माहिती अधिकाराच्या कायद्यान्वये शिक्षण विभागाकडून सर्व माहिती हस्तगत केली असून शहरांमध्ये सुरू असलेल्या खाजगी इंग्रजी शाळांच्या विरोधात आपण लवकरच न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी सुभाष देठे, अनिल ढवळे, फिरोज बागवान, अजित कोठारी, विजय खरात, तनुज बाहेती, यांची उपस्थिती होती.