जालना- अंबड तालुक्यातील एका महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे. वडिलोपार्जित शेतजमीन नातेवाईकांच्या नावे करून देण्यासाठी ही महिला तलाठी शेतकऱ्याकडून लाच घेत होती. मात्र, त्याचवेळी एसीबीच्या पथकाने तिला पकडले. संगीता जळबा हैबते (वय ३४) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराची आलमगाव शिवारात गट क्रमांक १३०मध्ये एक हेक्टर ७७ आर ही जमीन आहे. ती नातेवाईकांच्या नावे करून देण्यासाठी हैबते यांनी २ हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. मात्र, याबाबत त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज आलमगाव येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना संगीता हैबते यांना रंगेहात पकडले. तिच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, एस.एन.शेख. ज्ञानेश्वर झुंबड, मनोहर खाडे आदींनी ही कारवाई केली.
हेही वाचा- वस्तु भांडारवाल्यांना आंदोलनाचाही मिळेना हक्क; प्रशासनाने नाकारली परवानगी