जालना - राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या महिला राज्यगृहातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना दिनांक ११ जून २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ज्योती विजय तांगडे असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.
जुन्या जालन्यातील उड्डाणपुलाजवळ शासकीय महिला राज्यगृह आहे. तिथे समाजातील विविध स्तरातील पीडित महिलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात ज्योती तांगडे हिला महिला बालकल्याण समितीच्या पत्रावरून दिनांक २१ एप्रिल रोजी प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर दिनांक ११ जून रोजी सायंकाळी वसतिगृह वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ज्योती जेवण करण्यासाठी खालच्या मजल्यावर आली आणि त्यानंतर साडेआठ वाजता अचानक गायब झाली. ती दोन दिवस न परतल्याने दिनांक १३ जून रोजी या वसतिगृहाचे अधीक्षक भगवान आसाराम कनगरे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून या मुलीचा तपास लागत नसल्यामुळे पोलिसांनी आता प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचे ठरवले असून त्या अनुषंगाने या मुलीच्या छायाचित्राच्या प्रसिद्धीस देखील परवानगी दिली आहे. दोन महिन्यापूर्वी याच मुली संदर्भात घनसावंगी येथे देखील गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण बाल सुधारगृहाकडे गेले. बाल सुधारगृहाने आणि दिलेल्या आदेशानुसार या मुलीला येथील शासकीय महिला राज्यगृहात सोपविण्यात आले होते. मात्र येथून देखील ही मुलगी बेपत्ता झाली.
घनसांगी तालुक्यातील येवला येथील शासकीय महिला राज्यगृहाचे अधीक्षक भगवान आसाराम कनगरे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की ज्योती विजय तांगडे ही प्रियकरासोबत पळून गेली आहे. त्यासंदर्भात तिला घनसावंगी पोलिसांनी यापूर्वी एकदा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले असता तिच्या आईने या प्रकरणाला विरोध केला. त्यामुळे ज्योतीने आईकडे जायचे नाही असे सांगितले. नंतर घनसांगी पोलीस ठाण्यातून आर. बी. मोरे यांनी महिला राज्यगृह, जालना येथे या मुलीला सोपवले होते. दिनांक ११ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी तळमजल्यावर ती आली असता अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले असल्याचेही म्हटले जात आहे.