जालना - सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि याविषयी वाहन चालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवारी 'रस्ता सुरक्षा रॅली'चे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना वाहतूक नियमांविषयी माहिती देण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या पुढाकाराने ११ जानेवारीपासून 'रस्ते सुरक्षा सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त शिवाजी पुतळा येथून काढलेल्या या रॅलीमध्ये शहर वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस वाहतूक शाखा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाहन चालक प्रशिक्षण संस्था, दुचाकी वाहन विक्रेते आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
ही रॅली शिवाजी पुतळा, मस्तगड, गांधीचमन मार्गे निघाली आणि मोतीबाग येथे रॅलीचा समारोप झाला. दरम्यान, शहरातील वाहन चालकाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी देखील आपली वाहने रॅलीमध्ये सहभागी केली होती. मोतीबाग येथे या रॅलीला सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले आणि सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे, मोबाईलवर बोलू नये, दोन पेक्षा जास्त प्रवाशांनी दुचाकीवर बसू नये, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावा अशा अनेक उपाययोजना त्यांनी सांगितल्या.
हेही वाचा - नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, जालन्यात गोयल यांच्या प्रतिमेचे दहन
या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वेणूप्रसाद पारवेकर, मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, एनपी पाटील, एनएस पाटील, उदय सोळंके, हनुमंत सुळे, यांच्यासह 'वाहन चालक प्रशिक्षण असोशियन'चे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर, कार्यक्रमाचे नियोजन शंकर जोशी यांनी केले.
हेही वाचा - सुप्रिया सुळेंनी आवरता घेतला उद्घाटन समारंभ; चिरंजीवाच्या वाढदिवसाला जाण्याची घाई