जालना - विधानसभेच्या निवडणुकीसाठी बंदोबस्तावर जाणाऱ्या 3000 पोलीस कर्मचाऱ्यांना रविवारी दैनंदिन वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये पोलीस प्रशासन, राज्य राखीव दल, आणि होमगार्ड यांचा समावेश आहे.
आज (रविवार) सकाळपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ईव्हीएम मशीन वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सोमवारी होत असलेल्या निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस कर्मचार्यांनाही पोलीस प्रशासनाच्या वतीने दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये ब्रश, बिस्किट पुडा, पाणी बॉटल, डोक्याला लावण्याचे तेल, आदी वस्तूंचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख, चंदनजिराचे पोलीस निरीक्षक कोठावले, वाहतूक शाखेचे चत्रभुज काकडे, गुप्तवार्ताचे श्रीकृष्ण जावळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जालना जिल्ह्यात जनजागृती
हेही वाचा - जालन्यातील गायत्री नगरातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार