जालना - रेल्वे स्थानकावर आरक्षणाचे तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशाला दलालाने मारहाण करून प्रवाशाला जखमी केल्याची घटना आज सकाळी 8 च्या सुमारास घडली. दरम्यान मारहाण करणारा दलाल पळून गेला. याच वेळी स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला भिकाऱ्यांमध्ये काठ्यांनी मारहाण सुरू झाली. यामुळे स्थानकामध्ये दहशतीचे वातावरण असून प्रवासी त्रस्त झाले आहेत.
जालना रेल्वे स्थानक म्हणजे "आवो जावो, घर तुम्हारा" अशी परिस्थिती झाली आहे. कोणीही यावे आणि स्थानकावर मुक्काम ठोकून जावे. यामुळे स्थानकावरील भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातूनच अवैध धंद्यांना वाव मिळत आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास आरक्षण खिडकी जवळ भाग्यनगरमध्ये राहणाऱ्या शेख असलम यांनी मुंबईकडे जाण्यासाठी तिकिटाचा फॉर्म भरला, मात्र पाठीमागून आलेल्या दलालांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये असलम खाली पडले आणि रक्तबंबाळ झाले. अशा परिस्थितीत त्यांनी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कार्यालयात कोणीच नसल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिलेल्या नोंदीवरून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी जालना स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला दोन भिकाऱ्यांमध्ये चांगली हाणामारी सुरू झाली. यामुळे खाली बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक तरुणेश त्रिपाठी यांनी सांगितले, सकाळी झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासात असून ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात येईल. मागील तीन महिन्यात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापककडे सुरक्ष कर्मचारी अपुरे असल्याच्या तक्रारी स्थानिक सल्लागार समितीने केल्या होत्या. मात्र, त्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही.