जालना- खरेदी केलेल्या भूखंडावरील चुकीचे नाव दुरुस्त करण्यासाठी, दोन हजार रुपयांची लाच मागणारा पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. उपाधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील माधव पांडुरंग उगले (वय 54) असे या लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मालमत्ता प्रमाणपत्र लागले होते चुकीचे नाव
पर्यवेक्षका विरोधात तक्रार दाखल करणारा व्यक्ती हा सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहे. त्यांनी 2020 मध्ये जालना शहरात एक भूखंड खरेदी केला होता. खरेदी करत असताना मालमत्ता प्रमाणपत्र अर्थात पीआर कार्डवर चुकीचे नाव लागले होते. त्यामुळे हे नाव बदलून द्यावे या मागणीसाठी दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी तक्रारदाराने उपाधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात रितसर अर्जही केला होता. परंतू हा बदल झालाच नाही. त्यामुळे तक्रारदाराने या कार्यालयाचे पर्यवेक्षक माधव पांडुरंग उगले यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी हे नाव दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. तसेच हा भूखंड मोजून देण्यासाठी सहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.सध्या कोरोना ची परिस्थिती असल्यामुळे कर्मचारी अपुरे आहेत, त्यामुळे सरकारी काम होणार नाही. मात्र खाजगीमध्ये मी स्वतः भूखंड पैसे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मोजून देतो असेही उगले यांनी तक्रारदाराला सांगितले.
तक्रारदाराची लाच देण्याची नव्हती इच्छा
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गुरुवारी ३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्यानी संपर्क साधला आणि तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले, आणि शुक्रवारी ४ जून रोजी माधव उगले यांनी दोन हजार रुपये आणून देण्याचे सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना माधव उगले यांना रंगेहात पकडले आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस .एस. ताटे, पोलीस कर्मचारी ज्ञानदेव जुबड, अनिल सानप, गजानन घायवट, गणेश भुजाडे ,आरेफ शेख, यांनी ही कारवाई केली.