जालना - अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेली ५० वर्षीय महिला चंदंनजिरा पोलिसांनी सापडली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीड वाजता या महिलेला सुखरूप तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
ही महिला लग्न समारंभामध्ये आचाराच्या हाताखाली पोळ्या करण्याचे काम करते. असा एक कार्यक्रम आटोपून काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नवीन मोंढा ते राजूर चौफुली या रस्त्यावरून ती जात होती. या वेळी पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनातील अज्ञातांनी या महिलेला बळजबरीने वाहनात बसवले आणि एक तास फिरत राहिल्यानंतर रेल्वे पटरी जवळ आणले. येथे अज्ञात व्यक्ती दारू पीत असल्याचा फायदा घेत महिलेने वाहनातून धूम ठोकली. अज्ञातांनी महिलेचा खूप शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही. महिला सुमारे एक तास एका मोसंबीच्या आडोशाला बसून राहिली. तिने मांडवा गावात राहणाऱ्या तिच्या जावयाला सर्व हकीकत सांगितली. मात्र, ठिकाण कोणते आहे हे तिला सांगता न आल्यामुळे तिने आजूबाजूचे वर्णन सांगितले. त्यानंतर महिलेच्या जावयाने रात्री दहा वाजता चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांना याबाबत कळवले.
हेही वाचा - भोकरदनमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी; पुतण्याचा मृत्यू
...असा लागला शोध
पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे व त्यांच्या पथकाने आणि महिलेच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, महिलेने फक्त रेल्वे पटरी जवळील मोसंबी आणि उसाचे शेत एवढेच वर्णन सांगितल्याने व तिचा फोन बंद असल्याने पोलिसांना तिला शोधने कठीण झाले. तरी देखील पोलिसांनी अंदाजित वर्णनानुसार सारवाडी, रोहनवाडी, लोंढेवाडी या गावातील स्थानिक लोकांना ठिकाणाचे वर्णन सांगून त्यांची मदत घेतली आणि पाच लोकांचा एक समूह तयार करून त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी देऊन महिलेचा शोध सुरू केला. त्यानंतर एका झुडपामध्ये घाबरलेल्या अवस्थेत महिला आढळून आली. पोलिसांनी महिलेला चंदंनजिरा पोलीस ठाण्यात आणले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रात्री दोन वाजता अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - जालना; किरकोळ वादावरुन तलवारीने मारामारी; ९ जणांवर गुन्हा दाखल