जालना- तालुक्यातील घाणेवाडी शिवारात हॉटेल ऋतुराजमध्ये हॉटेल चालक आणि नोकराच्या संगनमताने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल सायंकाळी धाड टाकली. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आणि एक २२ वर्षीय तरुणी रंगेहात पकडले गेले. दरम्यान, या हॉटेलमधील दारूचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे एक लाख ८८ हजार रुपये इतकी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घाणेवाडी शिवारातील हॉटेल ऋतुराजमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती. या हॉटेलचा मालक गोविंद रमेश बावणे व त्याचा नोकर राजू बबनराव पैठणकर (दोघेही रा. घाणेवाडी) याने जास्तीचा पैसा कमवण्यासाठी हॉटेलमधील खोल्या किरायाने देऊन आणि तरुणींना बोलावून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नियोजन करून हॉटेलात धाड टाकली. यावेळी हॉटेल मालक गोविंद रमेश बावणे व त्याचा नोकर राजू बबनराव पैठणकर यांच्यासह एक अल्पवयीन मुलगी, एक २२ वर्षीय तरुणी त्याचबरोबर, ग्राहक सुनील विलास मरकड (रा. गोंदी तालुका, अंबड, मु. चंदंनझिरा) व संदीप मिठू गवळी (रा. योगेश नगर, जालना) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
दरम्यान, वेश्या व्यवसायाची खात्री करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली होती. आणि बनावट ग्राहकही तयार केले होते. पोलिसांनी काल दुपारी या बनावट ग्राहकांना हॉटेलचे मालक बावणे यांच्याशी बोलून व्यवहार ठरवला होता. त्यानुसार पैसे देऊन बनावट ग्राहक आतमध्ये सोडल्यानंतर ही धाड टाकण्यात आली. त्याचबोरबर, पोलिसांनी ऋतुराज बिअर शॉपीमध्ये वेगवेगळ्या कंपनीची बेकायदेशीर असलेली विदेशी दारू, तसेच महिलांच्या ताब्यातील रोख रक्कम व बिअर शॉपी मधील दारू, असा एकूण १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सुरेश गीते, प्रशांत देशमुख आदींनी ही कारवाई केली. चंदंनझिरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- जालन्यात आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये महत्वांच्या पदाकडे उमेदवारांची पाठ