जालना - भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित हा तिसरा रुग्ण आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये आलेला जालना जिल्हा आता पुन्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.
जालना जिल्ह्यात 6 एप्रिलला एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या महिलेचा शेवटचा अहवाल 13 तारखेला निगेटिव आला. त्यामुळे जालना जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला होता, मात्र अवघे चार तास उलटाच परतूर तालुक्यातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि जिल्हा पुन्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. आज (दि 29) पुन्हा तसेच झाले आहे. सकाळी 11 वाजता परतूर तालुक्यातील कोरोना आजारातून बरी झालेल्या महिलेला आनंदाने निरोप दिला गेला आणि सात वाजता भोकरदन तालुक्यातील पारध येथील तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला.
पारध येथील हे कुटुंब गुजरातला कामानिमित्त गेले होते. गुजरातहून परत आल्यानंतर या चौघांनाही जालना येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे काल (दि. 28) स्वॅब घेण्यात आले होते. याचा अहवाल आज प्राप्त झाला. या चौघांपैकी एकजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यावर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.