जालना - विषारी पाणी प्यायल्यामुळे काळवीट, हरीण, शेळ्या आणि गाई अशा जवळपास १६ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी देवमुर्ती शिवारामध्ये घडली. या प्राण्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
देवमुर्ती शिवारमध्ये एका शेतकऱ्याने वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले होते. परंतु अज्ञात माथेफिरुने त्यामध्ये विषारी द्रव टाकले. ते पाणी पिऊन सुमारे १६ प्राण्यांचा मृत्यू झाला. यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दोषी व्यक्तींवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे झाले तर यापुढे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडणार नाहीत आणि वन्यजीवांचे रक्षण होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड, प्रधान सचिव ज्ञानेश्वर गिराम, सोनाजी काळे, राजेंद्र साबळे, संजय हेरकर, शंकर वाखारे, नारायण माहोरे आदी उपस्थित होते.