बदनापूर (जालना) - तालुक्यातील देवगावफाटा ते माळेगावपर्यंतच्या रखडलेल्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी साडेबारा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला. ३ मीटर रूंद असलेला हा रस्ता आता साडेपाच मीटरचा होणार आहे. बांधकाम मंत्री चव्हाण यांनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर ही घोषणा करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले.
मंत्री अशोक चव्हाण यांनी रस्त्याची केली पाहणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तालुक्यातील देवगाव-कुसळी रस्ता, धोपटेश्वर रस्ता आदी रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर कुसळी येथे त्यांनी संवाद साधला. यावेळी देवगाव फाटा ते माळेगाव या रस्त्याला मंजुरी मिळून वर्ष उलटले असले तर या रस्त्यावर डांबरमिश्रीत खडी टाकून ठेकेदाराला आता दीड ते दोन वर्ष पूर्ण झाले. तरी त्यावर डांबराचे अस्तरीकरण लवकर झालेच नाही.
आज (२७ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर कुसळी येथे आल्यानंतर या रस्त्याला 8 कोटी 50 लाख तर 4 पूलासाठी 4 कोटी रुपये अतिरिक्त मंजूर केले. त्यामुळे हा रस्ता चांगला होणार आहे. तीन मीटरचा असलेला हा रस्ता साडेपाच मीटरचा बनवण्यात येणार आहे.
यावेळी भाजपच्यावतीने बांधकाम मंत्री चव्हाण यांना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान जास्त असून शेतकऱ्यांना फळबागांसाठी १ लाख रुपये, बागायतीसाठी ५० हजार रुपये तर कोरडवाहूसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी निवेदन आमदार नारायण कुचे यांनी दिले. यावेळी मंत्री अशोक चव्हाण यांनी विलास औताडे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राजाभाऊ देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अॅड सुभाष मगरे, भीमराव डोंगरे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी ठक्के, तलाठी सलरा मरमट अन्वर शेख, मनवर बेग, कौसर बेग, अजमत तुला बेग, कडेगाव सरपंच भीमराव जाधव, दत्तू निंबाळकर डॉक्टर बद्रीनाथ वैद्य आदींच्या उपस्थित या रस्त्याची पाहणी केली.
देवगाव फाटा ते माळेगाव या १२ कि.मी. अंतराचे काम मागील दोन वर्षांपासून ठेकेदाराच्या मनमानीमुळे रखडलेले होते. मातीमिश्रीत मुरुम वापरल्यामुळे कुसळीच्या नागरिकांनी काम बंद केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष देऊन या रस्ताच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता लवकरच हा रस्ता साडेपाच मीटर रूंदीचा होणार आहे. यावेळी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले कार्यकारी उपअभियंता मोरे यांना निधी मंजूर करण्यात आला आता त्वरित रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिले. यावेळी परमेश्वर गोते, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे, संतोष वरकड, विलास वैद्य, अंबादास वैद्य, संभाजी शेळके, रामदास शेळके, जालिंदर भेरे, श्रीमंत वैद्य, अशोक जाधव यांच्यासह मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.