जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव हा कायमस्वरुपी दुष्काळी असलेला तालुका. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून चांगला पाऊस पडत नसल्याने तालुकावासीयांना दुष्काळाच्या झळा असह्य झाल्या होत्या. मात्र, पंचक्रोशातील गावकऱ्यांनी हार न मानता एकत्र येत जलसंधारणाची उत्तम कामे केली. त्यामुळे तालुक्यातील कोरडेठाक पडलेले पाण्याची स्रोते भरली असून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.
चाळीसगाव तालुक्याची 'दुष्काळी तालुका' ही ओळख पुसण्यासाठी खेडगाव, खेडी, दस्केबर्डी, पोहरे आणि कळमडू या गावांमधील तरुण, 'चाळीसगाव विकास मंच' च्या माध्यमातून एकत्र आले. जलसंधारणाची कामे केल्याशिवाय दुष्काळावर मात करता येणार नाही, ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना सुरुवातीला खूप अडचणी झाल्या, विरोध झाला. अनेकांनी टिका केली व दडपणही आणले. मात्र, हार न मानता उराशी बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी ते काम करत राहिले. पुढे ग्रामस्थांची साथ मिळाल्यावर त्यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा लाभ पदरात पाडून घेतला. तरुणांनी लोकसहभागातून पाचही गावांच्या शिवारात असलेल्या नारळी आणि उतावळी, या दोन्ही नद्यांचे प्रत्येकी चार-चार किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण केले. पांझण डाव्या कालव्यासह परिसरातील २७ लहानमोठ्या नाल्यांचेही खोलीकरण करत त्यावर बंधारे बांधले. नारळी आणि उतावळी नदीवर साखळी पद्धतीने ११ मोठे बंधारे बांधले.
मात्र, विधायक काम करणाऱ्या तरुणाईची वरूणराजाने कसोटी घेतली. जलसंधारणाच्या कामांचे २ टप्पे पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षे पाऊसच पडला नाही. तरीही नाउमेद न होता तरुणांनी काम सुरूच ठेवले. शेवटी त्यांच्या कष्टाला फळ मिळाले. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने दोन्ही नद्या, बंधारे, नाले पाण्याने तुडुंब भरली आहेत.
तरुणांच्या मेहनतीचा गांवांना असा झाला फायदा...
'चाळीसगाव विकास मंच' च्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आज खेडगाव, खेडी, दस्केबर्डी, पोहरे आणि कळमडू या गावांमधील साडेचार हजार हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली आले आहे. नारळी आणि उतावळी नद्यांवरील साखळी बंधारे तसेच लहानमोठ्या नाल्यांमध्ये ३२ कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतीला होणार असून पाचही गावातील ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या विहिरी देखील जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यामातून तरुण एकत्र आलेत.....
व्हॉट्सऍपमुळे एकत्र आलेल्या तरुणांना 'चाळीसगाव विकास मंच' नावाच्या व्यासपीठामुळे दुष्काळी भागात जलक्रांती घडवून आणण्याचे बळ मिळाले. कर्मभूमीचे पांग फेडण्याच्या जिद्दीने पेटलेले हे तरुण इथेच थांबले नाहीत. आपल्या गावांमध्ये शिक्षण, आरोग्याच्या मूलभूत सुविधा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरूच आहे. गावाच्या प्रगतीला अडसर आणणाऱ्या शक्तीविरोधातही ते संघर्ष करत आहेत.