जळगाव - शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. शहरातील शिवाजी नगरमधील इंद्रप्रस्थ नगरातील रिक्षा थांब्यावर रविवारी रात्री १२ वाजता भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा (३०, रा.इंद्रप्रस्थ नगर) याचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. मारेकरी तीन जण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यातील अतुल काटकर (रा. शिवाजी नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोघांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय यरुळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून भूषण याला देवकर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शिवीगाळ केल्यावरुन वाद झाला व त्यातच खुनाची घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. भूषण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता.
पोटात आणि मांडीवर वार
हल्लेखोरांनी भूषणच्या पोटात तसेच पायावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात आई व इतर नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. भूषण याच्या पश्चात आई, तीन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.