जळगाव - वडीलांच्या जागेवर जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मजुरीच्या कामास गेलेल्या तरुणाचा विजतारांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. महावितरण कंपनीचे खांब उभे करीत असताना हा खांब बाजुला असलेल्या दुसऱ्या एका ३३ केव्ही वीजप्रवाह असलेल्या खांबावर पडल्याने तरुणाला शॉक लागला. एकुलता मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला होता. विशाल नकुल गायकवाड (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
एमआ यडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद-
भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील रहीवासी विशाल व त्याचे वडील शेतीकाम, मजुरी करतात. वडिलांना शेतात काम असल्याने ते चिंचोली येथे विद्युत खांब उभारण्याच्या मक्तेदाराकडील कामासाठी गेले नाहीत. त्याऐवजी मुलगा विशाल हा कामावर गेला होता. वाघूर फिडरसाठी चिंचोली शिवारात विद्युत खांब उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी विशालसह ईश्वर शेळके, वसंत घ्यार, सोनु सोनवणे, अक्षय घ्यार हे देखील कामावर गेले होते. ट्रॅक्टरवरील खांब हायड्रोलिकच्या साह्याने उचलुन खड्ड्यात ठेवत असताना अचानक त्यांचा ट्रॅक्टर कलंडला. यामुळे हायड्रोलिकने उचललेला खांब थेट शेजारी असलेल्या ३३ केव्ही विद्युत प्रवाह असलेल्या खांबावर पडला. यामुळे ट्रॅक्टरमधील खांबात विद्युत प्रवाह आल्याने सर्वांना विजेचा धक्का लागला. यात विशाल याचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षय घ्यार याच्या मांडीत खांब घुसुन जखमी झाला तर ईश्वर शेळके हे बेशुद्ध झाले.
या अपघातानंतर चिंचोली गावातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. विशाल याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या 'मसुदा आणि हेतू'वर बोलण्याच्या आवाहनाला राहुल गांधींचे उत्तर