जळगाव - कंजारभाट जातपंचायतीच्या जाचास कंटाळून एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी जळगावात घडली आहे. मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे (रा. कंजरवाडा, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. मानसीच्या आई-वडिलांनी 20 वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यामुळे तिला कंजारभाट जातीत सामावून कुळ देण्यास जातपंचायतीच्या सदस्यांसह तिच्या आजोबांचा नकार होता. हा त्रास असह्य झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
मानसीचे वडील आनंद बागडे हे 'एमएसईबी'त नोकरीला आहेत. त्यांनी 20 वर्षांपूर्वी बानो नामक महिलेशी आंतरधर्मीय विवाह केला होता. या दोघांना मानसी आणि काजल या मुली आहेत. मात्र, हा विवाह आनंद यांचे वडील दिनकर बागडे यांना मान्य नव्हता. ते कंजारभाट जातपंचायतीचे सरपंच असल्याने त्यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. म्हणून त्यांनी आनंद यांचा आधी विवाह झालेला असताना जातीतील दुसऱ्या महिलेशी विवाह लावून दिला होता. या विवाहानंतर आनंद हे बानो यांना सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. दरम्यान, आता आनंद यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी मानसीचे लग्नाचे वय झाले होते. तिचा विवाह कंजारभाट समाजातील मुलाशी व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. याप्रश्नी मानसीचे काका विजय बागडे यांनी पुढाकार घेत तिच्यासाठी समाजातील कोल्हापूरचा मुलगा शोधला होता. परंतु, तिचे आजोबा दिनकर बागडे यांचा तिला जातीत घेऊन 'जातगंगा' देण्यास विरोध होता. आजोबांचा नकार असल्याने जातपंचायतीचा देखील या गोष्टीला विरोधच होता. या जाचाला कंटाळून अखेर मानसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
असे फुटले घटनेचे बिंग
मानसीने आत्महत्या केल्यानंतर बागडे कुटुंबीय हादरले. त्यांनी तिचा मृत्यू मेंदूत ताप गेल्याने नैसर्गिकरित्या झाल्याचे दर्शवले. दूरवरचे नातेवाईक अंत्यसंस्काराला येणार असल्याचे सांगत हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह घरातच तब्बल 12 तास ठेवला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मात्र, या घटनेसंदर्भात माहिती देणारा फोन अज्ञात व्यक्तीने एमआयडीसी पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत मानसीचा अंत्यसंस्कार थांबवत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. त्यात तिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे उघड होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
मुंबईहून पोलिसांना आला तक्रार अर्ज
दरम्यान, याच काळात 'कंजारभाट समाजातील जातपंचायतीच्या जाचास कंटाळून युवतीने आत्महत्या केली असून या प्रकरणाचा सखोल तपास करावा' अशा तक्रारीचा एक अर्ज एमआयडीसी पोलिसांना मुंबईहून मिळाला. हा अर्ज महात्मा फुले जीवनदायी योजनेचे उपसंचालक कृष्णा इंद्रेकर यांनी पोलिसांकडे केला आहे. या अर्जाची दखल घेऊन पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही पोलिसांनी प्राथमिक जबाब नोंदवण्यापलीकडे अटकसत्र राबवलेले नाही.
अंत्यसंस्कारासाठी 15 हजारांचा दंड घेतल्याचा आरोप
कृष्णा इंद्रेकर यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात, जातपंचायतीने मानसीवर समाजाच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या वडिलांकडून 15 हजार रुपयांचा दंड घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र, जातपंचायतीच्या सदस्यांनी सारे आरोप फेटाळून लावले आहेत. मानसीने कौटुंबीक कारणातून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाशी जातपंचायतीचा संबंध नसल्याचे जातपंचायतीचे म्हणणे आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार खचावं म्हणूनच 'फोन टॅपिंग'