जळगाव - 'रक्ताला कधीही नसतात जाती-धर्माच्या भिंती, रक्तदानाने निर्माण होतात फक्त माणुसकीची नाती', हेच ब्रीद खऱ्या अर्थाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेने सिद्ध केले आहे. या शाखेने दिवसेंदिवस नवीन व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. गावोगावी जाऊन रक्त संकलनावर भर देत रुग्णांना संकटसमयी वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याची चोख कामगिरी ही शाखा अविरतपणे करत आहे. आज, म्हणजेच 8 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त 'इंडियन रेडक्रॉस सोसायटी'च्या जळगाव शाखेचा घेतलेला हा आढावा..
जिल्ह्यातील 75 टक्के रक्ताची गरज भागवते रेडक्रॉसची रक्तपेढी -
इंडियन रेडक्रॉस सोसायटीची मुख्य रक्तपेढी ही जळगावात आहे. दुसरी शाखा चोपडा शहरात आहे. या दोन्ही शाखांच्या माध्यमातून आजमितीला जिल्ह्यातील 75 टक्के रक्ताची गरज रेडक्रॉस सोसायटीची रक्तपेढी भागवते. विशेष म्हणजे, या रक्तपेढीत शासकीय दरापेक्षा कमी दरात रुग्णांना रक्ताचा पुरवठा होतो. एकाच वेळी 7 हजार रक्त पिशव्या साठवण्याची रक्तपेढीची क्षमता आहे. 'कंपोनंट सेप्रेशन' तंत्रज्ञानाद्वारे एका व्यक्तीने दान केलेल्या रक्ताचे घटक वेगळे केले जातात. त्यातून चार जणांचे जीव कसे वाचवता येतील, याचा प्रयत्न असतो. गरजू रुग्णांसाठी तत्काळ रक्त, प्लेटलेट्स तसेच प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी रक्तपेढीचे कर्मचारी प्रयत्नशील असतात.
'रक्तपेढी आपल्या दारी' अभिनव उपक्रम -
जे लोक रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीत येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी रक्तपेढीने 2008 साली अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याने सुसज्ज असलेली डोनर व्हॅन उपलब्ध केली. या व्हॅनच्या माध्यमातून 'रक्तपेढी आपल्या दारी' अभिनव उपक्रम राबवला जात असून, जास्तीत जास्त रक्त संकलन केले जात आहे. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये ही डोनर व्हॅन मोलाची भूमिका बजावते.
रक्तदान जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन -
रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीच्या वतीने रक्तदानाच्या जागृतीसाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिरांसह आरोग्य शिबिरेही आयोजित केली जातात. एवढेच नव्हे तर 'समाजाचे आपण काही देणं लागतो' या उदात्त भावनेतून सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात रेडक्रॉस सोसायटी अग्रेसर असते. आता कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेला मदत म्हणून रेडक्रॉस सोसायटीतर्फे नागरिकांची कोरोना तपासणी, कोरोना लसीकरण केले जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी आरोग्य सेवा ठप्प झाली होती. तेव्हापासून रेडक्रॉस सोसायटीचा धर्मार्थ दवाखाना सुरू आहे. याठिकाणी गोरगरिबांना उपचाराची सोय झाली आहे.
हेन्री ड्युनॉट यांच्या स्मरणार्थ साजरा होतो रेडक्रॉस दिन -
शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे हेन्री ड्युनॉट हे रेडक्रॉस चळवळीचे संस्थापक आहेत. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक रेडक्रॉस दिवस' म्हणून साजरा केला जातो. ड्युनॉट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमवर साजरा होत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर रेडक्रॉसची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांनी ही चळवळ सर्वदूर पोहचली. मानवी दुःखाचा परिहार करणारी चळवळ म्हणून रेडक्रॉस चळवळीकडे पाहिले जाते.
इतिहासाची पाने चाळताना -
सन 1859 मध्ये हेन्री ड्युनॉट यांनी नेपोलिनच्या युद्धाच्या वेळी अनेक सैनिक तसेच लोकांना जखमी होताना पाहिले. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी सैनिक तसेच लोकांची शुश्रूषा केली. त्यांचे हे कार्य सुरू असताना काही काळ लोटला. त्यानंतर जिनिव्हा येथे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आले. नंतर सर्वांना सोबत घेऊन हेन्री ड्युनॉट यांनी एक समिती स्थापन केली. ते स्वतः समितीचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. पुढे याच समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना झाली. येथून खऱ्या अर्थाने रेडक्रॉस चळवळ वृद्धिंगत झाली. 1864 मध्ये पहिली जागतिक रेडक्रॉस परिषद झाली. या परिषदेत विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी ऐतिहासिक जिनिव्हा करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रेडक्रॉसची कार्यप्रणाली याच जिनिव्हा करारावर आधारली आहे. पक्ष, वंश, धर्म यांचा विचार न करता मानवी दुःखाचे निवारण करणे हे रेडक्रॉस चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वयंप्रेरित आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून रेडक्रॉस संघटना उदयास आली आहे. आज जगातील प्रत्येक देश या संघटनेशी संलग्न आहे. मानवता, निष्पक्षपातीपणा, तटस्थपणा, स्वतंत्रता, ऐच्छिक सेवा, एकता तसेच विश्वात्मकता अशा तत्त्वांवर रेडक्रॉसचे कार्य चालते.