जळगाव - शहरातील औद्योगिक वसाहतीतील पटेल पॅकेजिंग या कंपनीत एका कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रवींद्र बाळू सपकाळे (वय ३०, रा. कठोरा, ता. जळगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
औद्योगिक वसाहतीत व्ही सेक्टरमध्ये पटेल पॅकेजिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीत बांधणीचे पुठ्ठे तयार होतात. रवींद्र सपकाळे हा गेल्या १६ वर्षांपासून या कंपनीत कामाला होता. बुधवारी दुपारी रवींद्र कंपनीत नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक काही यंत्रांमध्ये विजेचा प्रवाह उतरला असल्याचे त्याच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे तपासत असताना तो कंपनीच्या छतावरील पत्र्यावर चढला. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खाली जमिनीवर कोसळला.
कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रवींद्रच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सपकाळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
आर्थिक मदतीसाठी कंपनी मालक धारेवर-
या घटनेनंतर रवींद्रच्या नातेवाईकांनी कंपनी मालक पटेल यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप करत रवींद्रच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, म्हणून जिल्हा रुग्णालयात त्यांना धारेवर धरले. १६ वर्षांपासून रवींद्र कंपनीत काम करत असताना त्याला भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय उपचारासाठी विमा अशा कोणत्याही प्रकारची सुविधा लागू करण्यात आलेली नव्हती. आता रवींद्रचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे कंपनी मालकाने त्याच्या मुलांच्या नावे काही तरी रक्कम ठेव स्वरूपात ठेवावी, अशी मागणी रवींद्रच्या नातेवाईकांनी केली.
कंपनी मालक याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कंपनीच्या मालकाने ५ लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.