जळगाव - महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती' कायदा येणार आहे. या कायद्याला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिल्याने जळगावात रविवारी महिला संघटनांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. हा क्षण शहरातील टॉवर चौकात महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत साजरा केला. तसेच, नागरिकांना पेढे वाटत राज्य सरकारचे आभार मानले.
शक्ती कायद्यासाठी राज्य सरकारचे आभार
राज्य सरकारने महिला तसेच बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी 'शक्ती' कायद्याला मंजुरी दिल्याने महिला संघटनांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. रविवारी जळगावात भाजप वगळता महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात एकत्र येत राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी नागरिकांना पेढे वाटण्यात आले. राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शक्ती कायद्यामुळे आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसात शिक्षा होणार आहे. त्यामुळे नराधम महिलांकडे वाकड्या नजरेने बघणार नाहीत. आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने महिला व युवती निर्भयपणे वावरतील. राज्य सरकारने घेतलेला निर्णय निश्चितच चांगला आहे, अशा भावना महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा - सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे सांगत भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
कायद्यांची चौकट अधिक बळकट
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी 'शक्ती' या प्रस्तावित कायद्याला विधिमंडळासमोर सादर करण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याला मान्यता देण्यात आली आहे. या कायद्यानुसार शिक्षेचे प्रमाण वाढवले असून, नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
टॉवर चौकात जल्लोष साजरा करतेवेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मंगला पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, शिवसेनेच्या पदाधिकारी सरिता माळी, शोभा चौधरी आदींसह महिला संघटनांच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी राज्य सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - आळंदीत दारू आणि गांजा विकणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या