जळगाव - जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावात अवैध दारूविक्री विरोधात रणरागिणींनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या हफ्तेखोरीचे पितळ उघडे पाडले. अवैध दारूविक्रीच्या सातत्याने तक्रारी करुनही पोलिसांनी दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिलांनी 3 दुकाने पेटवून दिली. गुरुवारी (दि. 23 जानेवारी) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी बाटली आडवी
सुमारे 5 वर्षांपूर्वी वाघोड गावात बाटली आडवी झाली आहे. म्हणजे पाच वर्षांपूर्वीपासून या गावात दारुबंदी झाली होती. दारु विक्रीच्या विरोधात महिलांनी एकत्र येत एल्गार पुकारला होता. तेव्हा ग्रामपंचायतीने ठराव करत दारुबंदी केली होती. त्यानंतर काही दिवस दारुबंदी राहिली. मात्र, पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर दारुला आंगण मोकळे झाले. या सर्व प्रकाराला कंटाळून महिलांनी धाडस करून दारुची दुकाने जाळली. दारू पिणाऱ्यांची आरडाओरड, घरात पैसे न देता दारू पित महिलांना मारहाण करणे आदी प्रकार वाढले होते. दारू पिऊन कुटुंब अधोगतीला नेऊन मुलांच्या भविष्याचा विचार न करणे हा त्रास दिवसागणिक वाढतच होता. दारुबंदी करुनही फायदा होत नसल्याने महिलांच्या संयमाचा बांध सुटला व त्यांनी रणरागिणीचे रौप धारण करत आपल्या रुद्रावताराचे दर्शन घडविले.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात चारा टंचाई; ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय संकटात