जळगाव - पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील सोनाळा गावात घडला आहे. एवढेच नाही तर हा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रातोरात जेसीबी यंत्राद्वारे खड्डा खोदून प्राण्यांचे मृतदेह जमिनीत पुरण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जामनेर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी खोदकाम केल्यानंतर सत्य उघडकीस आले.
सरदार सरोवर प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यात जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारात गट क्रमांक 148 ते 152 पर्यंतचे गट पर्यायी वनीकरणासाठी वन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यात बऱ्यापैकी वृक्ष बहरलेले असून आहेत. जवळच 2 धरणे असल्याने या जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही चांगली आहे. मात्र, पर्यायी वनीकरणाला लागूनच पिंपळगाव व सोनाळा शिवार असून अनेक शेतकऱ्यांची तेथे शेती आहे. यामुळे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.
वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून सोनाळा येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या हौदात विष टाकले होते. यात 15 मोर, 10 माकडे, 1 काळवीट व एका नीलगायीचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकऱ्याने रातोरात जेसीबी यंत्राद्वारे खड्डा खोदून प्राण्यांचे मृतदेह जमिनीत पुरले. गावातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला होता. मात्र, गावातीलच रहिवासी असल्याने, वाद नको म्हणून हा प्रकार वन विभागाला सांगितले नाही.
गावात याबाबत आपापसात चर्चा सुरु होती. 2 दिवसांपूर्वी अखेर हा प्रकार जामनेर वनविभागाचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांना माहित झाला. तेव्हा त्यांनी घटनास्थळी जाऊन कर्मचारी व वनमजुरांकडून संशय असलेल्या ठिकाणी खोदून पाहिले असता माकडांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान, हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर वनविभागाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यासह जेसीबी चालक, या प्रकारात मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.