जळगाव - शहराच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीने स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न केल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेसात वाजता थकीत वेतनासाठी एका कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मनपा टी.बी. रुग्णालयालयाजवळ असलेल्या कचरा डेपोजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्याने अनर्थ टळला. राजू परदेशी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
शहराच्या साफसफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा ठेका नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. बुधवारी राजू परदेशी या कर्मचाऱ्याने महिनाभराचे वेतन थकीत असल्याने मनपा टी.बी. रुग्णालयाजवळील कचरा डेपोत वेतन मिळावे, या मागणीसाठी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कामबंद आंदोलन केल्यानंतर मक्तेदाराकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून लेखी म्हणणे घेतले होते. या प्रश्नी नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. राजू परदेशी हे देखील कामावर रुजू होण्यासाठी आले. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर घेण्यास नकार दिल्यामुळे परदेशी यांची शाब्दिक चकमक झाली. मक्तेदाराकडून कामावर घेण्यास नकार दिल्याने परदेशी यांनी रागाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष गेल्याने त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले.
वॉटरग्रेस कंपनीने जितके बिल काढले आहे. त्या बिलांची रक्कम जो पर्यंत मक्तेदाराकडून कामात सुधारणा होणार नाही; तो पर्यंत रोखून घेण्याचा सूचना उपमहापौर डॉ. अश्निन सोनवणे यांनी मनपा मुख्य लेखा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी लेखा अधिकाऱ्यांना दिले आहे. महासभेत मक्तेदाराला महिनाभरात कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला होता. मात्र, दहा दिवसात पाहणी केल्यास कोणतीही सुधारणा होत नसून, दररोज हा प्रश्न गंभीर होत जात आहे.