जळगाव - राज्याचे जलसंपदामंत्री आजपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाची पाहणी करत ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत जलसंपदामंत्री निधीची घोषणा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा प्रकल्प -
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे तापी नदीवर निम्न तापी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली. मात्र, गेल्या 25 वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. अमळनेर तालुक्याचे राजकारण या प्रकल्पावर अवलंबून राहिले आहे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पासंदर्भात आश्वासने देण्यात येतात. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा हा प्रकल्प असल्याचे बोलले जाते. आज जलसंपदा मंत्री आपल्या राजकीय दौऱ्याची सुरुवात या प्रकल्पाच्या पाहणीपासून करणार आहेत. या पाहणीत ते प्रकल्पासाठी काही निधीची घोषणा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निम्न तापी प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
निम्न तापी प्रकल्पाची क्षमता 14.85 टीएमसी असून या प्रकल्पाची तृतीय प्रशासकीय मान्यता किंमत 1127.74 कोटी रुपये आहे. तसेच केंद्रीय जल आयोगानुसार या प्रकल्पाची किंमत 2751.05 कोटी (सन 2016-17) रुपये होती. या प्रकल्पामुळे 25 हजार 657 हेक्टर क्षेत्र सिंचनाखालील येणार असून या प्रकल्पाचा लाभ अमळनेर, चोपडा, धरणगाव, पारोळा तालुक्यांना मिळणार आहे.
हेही वाचा - केंद्राकडून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ३ लाख कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस