जळगाव - विदर्भ तसेच मध्य प्रदेशात तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रांत जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे १४ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या १४ दरवाजांतून प्रति सेकंद 778 क्युसेक अर्थात 27 हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खानदेशातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ तसेच मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत अडीच मीटरने तर तापी नदीच्या पाणीपातळीत अर्ध्या मीटरने वाढ झाली आहे.
हतनूर धरणातून रेल्वे, आयुध निर्माण, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, जळगाव-भुसावळ व मलकापूर एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये या काळातहतनूरचा जिवंत जलसाठा ‘मायनस’ होता. मात्र, गेल्या वर्षी जोरदार पावसाने धरण काठोकाठ भरले. उन्हाळ्यात तापमान सरासरीच्या तुलनेत १.९ अंशाने कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी होता. लॉकडाऊन कालावधीत औद्योगिक व शहरांमधील व्यावसायिक पाणी वापर घटला. परिणामी, जुनच्या दुसऱ्या आठवड्यात आवक नसताना धरणाचा जिवंत पाणीसाठा ‘प्लस’मध्ये आहे.
१३० गावे, शहरांना धरणातून पाणीपुरवठा
भुसावळ शहर, रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर केंद्र, जळगाव आणि मलकापूर एमआयडीसी आदींसह जळगाव जिल्ह्यातील सुमारे १३० गावे व शहरांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा होतो. सोबतच यावल, चोपडा, रावेर तालुक्यांतील तब्बल ३७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.
दोन वर्षे बिकट, यंदा चांगली परिस्थिती
सन २०१८ मध्ये धरणातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होती. १२ जून २०१८ रोजी धरणात केवळ २०६.७० मीटर जलपातळी तर ९५.४० दलघमी जिवंत साठा होता. हे प्रमाण उणे १४.८० होते. सन २०१९ मध्येही स्थिती बिकटच होती. उणे २७.९० दलघमी जीवंत साठा होता. मात्र, २०२०चा उन्हाळा संपला तरीही धरणात ४७.२० दलघमी साठा आहे.
हतनूरची जून महिन्यातील स्थिती
परिमाण | 2018 | 2019 | 2020 |
जलपातळी (मीटर) | 206.070 | 206.505 | 209.510 |
जलसाठा (दलघमी) | 95.40 | 105.00 | 180.20 |
जिवंत साठा | -14.70 | -27.90 | 47.20 |
टक्केवारी | 5.76 | 10.98 | 18.51 |