जळगाव - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे. रुग्णांच्या अडचणी सोडवणे व त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या उपाययोजनेमुळे आरोग्याशी निगडित प्रश्न व समस्यांचे निराकरण करणे सोपे होणार आहे.
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. कोरोनाच्या नियंत्रणात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने त्यांनी प्रशासकीय ऑपरेशन करत 'वॉररूम' स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने तातडीने पावले उचलत वॉररूम उभारली आहे. या वॉररूममध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी, रुग्णांनी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२१७१९४ व टोल फ्री क्रमांक १०७७ कार्यान्वित करण्यात आले आहेत. वॉररूममध्ये सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने कोविड -१९ विषाणूच्या आजाराबाबत जिल्ह्यातील जनतेस, रुग्णास काही अडचणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथेही नियंत्रण कक्ष स्थापन-
आराेग्यमंत्र्याच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथेही नियंत्रण कक्ष स्थापन केले असून, त्यासाठी ०२५७-२२४२१११ हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे. याठिकाणी देखील प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांना त्वरित मिळणार प्रतिसाद-
या वॉररूमच्या माध्यमातून नागरिक आणि रुग्णांना प्रशासनाकडून त्वरित प्रतिसाद मिळणार आहे. कोरोना संदर्भातील माहिती, कोणाला रुग्णवाहिका हवी असल्यास, कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराबाबत येणाऱ्या अडचणी, अशा प्रकारची सर्व माहिती तसेच प्रशासकीय फीडबॅक देण्याचे काम या ठिकाणाहून होणार आहे. कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर तसेच कंटेन्मेंट झोनमधील सर्व्हे याचा दैनंदिन आढावा घेऊन प्रशासकीय कामकाज याच वॉररूममधून चालणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आणि 2 नायब तहसीलदार यांची टीम वॉररूमचे काम सांभाळणार आहेत.