जळगाव - कोणतीही निवडणूक म्हटली की नेतेमंडळीकडून विकासाची स्वप्ने दाखवून आश्वासनांची अक्षरशः खैरात वाटली जाते. पण निवडणूक संपल्यावर हीच मंडळी पुढची पाच वर्षे भूमिगत होते. मग पुन्हा पुढच्या वेळी तोच कित्ता गिरवला जातो. भोळीभाबडी जनता विकास होईल, याच अपेक्षेने मतदान करते. हेच चित्र आजवर आपण अनुभवलं. पण आता काळ बदलला आहे. मागच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचे काय? याचा जाब विचारायला जनता मागेपुढे पाहत नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात असाच प्रकार घडला आहे. एका मतदार महिलेने मत मागायला आलेल्या उमेदवाराला मागच्या आश्वासनांची आठवण करून देत त्याला चांगलेच फैलावर घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निवडणुका आल्या की गोडगोड बोलणारे आणि हात जोडलेले नेते आपल्याला भेटतात. पण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर पुढच्या निवडणुकीवेळी काय होऊ शकते, याचे 'ट्रेलर' दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील घटनेचा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात एका उमेदवाराला एका संतप्त महिला मतदाराचा रुद्रावतार पाहायला मिळाला. गावात मते मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला या महिलेने मागच्या काळात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्याबद्दल जाब विचारला. निवडून आल्यावर पाच वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्या उमेदवाराला त्या महिलेने चांगलेच फैलावर घेतले. या साऱ्या प्रकाराने उमेदवार ओशाळून गेला होता.
घटना कधीची हे मात्र, गुलदस्त्यात-
हा प्रकार नेमका कधी घडला? याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. संबंधित मतदार महिलेने मागच्या निवडणुकीवेळी त्या उमेदवाराने दिलेले विकासकामांचे आश्वासन का पूर्ण केले नाही, याचा खडसावून जाब विचारला. रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले नाही. आता कोणत्या तोंडाने मत मागायला आला? असा प्रश्न करत महिलेने उमेदवारासह लोकप्रतिनिधीला शिव्यांची लाखोली पण वाहिली.
बिचारा उमेदवार आल्या वाटेने गेला परत-
मतदार महिलेचा रुद्रावतार पाहून बिचाऱ्या उमेदवाराला आल्या वाटेने परत जावे लागले. 'जाऊ द्या... ताई नाराज आहे', असे म्हणत उमेदवार आणि त्याच्या सोबतच्या लोकांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. या व्हिडिओची खमंग चर्चा सुरू आहे. दरम्यान, हा व्हिडिओ उमेदवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे, हे मात्र निश्चित.