जळगाव - काँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री दिवंगत मधुकरराव चौधरी यांच्या खिरोदा गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावासाठी सन २०११ मध्ये मंजूर झालेली राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ८ वर्षे उलटूनही कार्यान्वित होऊ शकली नाही. या प्रकाराला जबाबदार असलेले अधिकारी तसेच ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच गावाची पाणीसमस्या त्वरित सोडविण्यासाठी अपूर्ण असलेली पाणी योजना पूर्ण करावी, या मागणीसाठी खिरोद्याच्या ग्रामस्थांनी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
रावेर तालुक्यात असलेल्या खिरोदा या गावाची लोकसंख्या सुमारे साडेपाच हजारांच्यावर आहे. माजीमंत्री मधुकरराव चौधरी यांचे गाव म्हणून खिरोदा गावाची जिल्ह्यात ओळख आहे. परंतु, सद्यस्थितीत या गावाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. २०११ मध्ये गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ कोटी २ लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि ठेकेदाराने कर्तव्यात कसूर केल्याने खिरोदेकरांना हक्काचे पाणी मिळू शकले नाही. आजही ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाने घेतली नाही उपोषणाची दखल-
जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे आता रखडलेली पाणी योजना पूर्ण झाल्याशिवाय गावाचा पाणीप्रश्न सुटू शकत नाही, अशी स्थिती आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे रखडलेली पाणी योजना पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी पाणी योजनेच्या मागणीसाठी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू होऊन आता चार दिवस उलटले आहेत. परंतु, अद्यापही उपोषणाची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली नाही. यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोवर पाणी योजनेसंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येत नाही; तोवर आम्ही उपोषण मागे घेणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. खिरोदा गावासाठी सध्या दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींचे पाणी पुरत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थ आक्रमक-
पाणीप्रश्नी खिरोदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सरपंच, उपसरपंचासह सर्वच ग्रामस्थ पाणी योजनेच्या मागणीसाठी आग्रही आहेत. माजीमंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात ठिकठिकाणी सिंचनाचे प्रश्न मार्गी लावले. पण जिल्हा परिषदेचे अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या गावातच आता पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.