जळगाव - कोणत्याही भाजीत कोथंबीर शिवाय चवच येत नाही. भाजीपाल्यातील सर्वसमावेशक ठरलेल्या कोथंबीरचे भाव दररोज वाढतच आहेत. गुरुवारी जळगावात कोथंबीर 180 रुपये प्रतिकिलोने विकली गेली. कोथंबीरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. अनेक जण विना कोथंबीरने काम भागवत असल्याचे दिसून येत आहे.
चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे अनेक बागायतदार भाजीपाला उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोनामुळे भाजीपालाचे उत्पादन करावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. अनेक शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र, आता मागणीपेक्षा मालाचा पुरवठा कमी असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कोथंबीर पीक सडून गेले. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने कोथंबीर 150 रुपये किलोच्या पुढे विकली जात आहे.
किरकोळ विक्रीत भाव जास्तच
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, यावल, रावेर, धरणगाव, चोपडा येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीस येत असतो. कोरोनामुळे ग्राहक सामाजिक अंतर ठेऊन भाजीपाला खरेदी करत आहेत. लिलावात कोथंबीर 150 ते 180 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्री करणारे भाजीविक्रेते देखील चढ्या दराने भाजीपाला विकत आहेत.
कोथिंबीरनंतर टोमॅटो खातोय भाव
सहा महिन्यांपूर्वी 10 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटोला आज सर्वच फळ भाज्यांमध्ये चढता भाव होता. टोमॅटो 60 ते 70 रुपये किलो दराने विकला गेला. दररोज 50 ते 60 रुपये किलोने चांगल्या प्रतीचा टोमॅटो बाजारात विकला जात आहे.
भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे किलोचे भाव
कोथिंबीर 170 ते 180 रुपये
टोमॅटो 50 ते 60 रूपये
मेथी 50 ते 60 रूपये
वांगे 40 ते 60 रूपये
कोबी 60 ते 80 रूपये
हिरवी मिरची 50 ते 60 रूपये