जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी विविध सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात मुंबई येथील श्री वर्धमान संस्कार धाम यांच्या सौजन्याने श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा आणि समस्त जैन संघाच्या वतीने गोरगरिबांना अन्नदान केले जात आहे. या माध्यमातून सकाळी तसेच रात्री अमळनेरातील सुमारे साडेचार ते पाच हजार लोकांची भूक भागत आहे.
'समाजाचे आपण काही देणं लागतो' या उदात्त भावनेतून मुंबई येथील श्री वर्धमान संस्कार धाम, अमळनेर तालुक्यातील पळासदडे शिवारातील श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा आणि समस्त जैन संघ लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. हातावर पोट असणाऱ्या गरजू मजुरांची जेवणाची अडचण लक्षात घेऊन त्यांनी दोनवेळ अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प असल्याने रोजंदारी करणाऱ्यांना कामधंदा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. हीच समस्या लक्षात घेऊन अन्नदान केले जात आहे.
अमळनेर शहरातील रुबजीनगर, ताडेपुरा, शाह आलम नगर, पैलाड, जुने बसस्थानक परिसर, वरणेश्वर महादेव मंदिर परिसर, गांधलीपुरा, ख्वाजानगर या भागात सर्वाधिक मजुरवर्ग वास्तव्यास आहे. लॉकडाऊनमुळे येथील मजुरांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यामुळे श्री वर्धमान संस्कार धाम यांच्या सौजन्याने श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा आणि समस्त जैन संघाच्या वतीने गोरगरिबांना अन्नदान केले जात आहे. शहरातील 1 ठिकाणी दररोज अन्नदान केले जात आहे. सकाळ आणि रात्रमिळून सुमारे साडेचार ते पाच हजार लोकांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अत्यंत उत्तम दर्जाचे जेवण लोकांना दिले जात आहे.
दरम्यान, या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, जेवण वाटप 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. जेवणासाठी लोक घरून भांडी घेऊन येतात. सुरक्षेच्या दृष्टीने आखून दिलेल्या एका रांगेतील वर्तुळात त्यांना थांबावे लागते. क्रमांकानुसार प्रत्येकाला जेवण दिले जाते. विशेष म्हणजे, या उपक्रमाची दखल इतर सेवाभावी संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी घेतली असून पाठबळ देऊ केले आहे.