जळगाव - CAA तसेच NRC च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (शुक्रवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. जळगाव शहरात सकाळच्या सत्रात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला तर दुपारनंतर बंदला मिळालेला प्रतिसाद हळूहळू ओसरला. दुपारी 1 वाजेनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठ सुरळीत चालू झाली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, रावेर तसेच जळगाव तालुक्यातील या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सत्रात बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रमुख बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार तसेच सराफ बाजारातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मात्र, दुपारनंतर चित्र बदलले. दुकांनासह सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक
बंद शांततेत -
जळगाव जिल्ह्यात वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला जिल्हाभरात कुठेही गालबोट लागले नाही. सर्वत्र बंद शांततेत पार पडला. दरम्यान, बसफेऱ्या देखील सुरळीत सुरू होती.