जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला प्रचंड चुरशीची वाटणारी निवडणूक निकालानंतर मोदी फॅक्टरमुळे पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गटबाजीचा फटका भाजपला बसेल, असे चित्र असताना भाजपच्या उमेदवार उन्मेष पाटलांनी सहाही विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मते मिळवल्याने सर्वच राजकीय जाणकारांचे आडाखे फसले आहेत.
स्थानिक भाजपमधील अंतर्गत दुफळीचा अंदाज घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव मतदारसंघातून गुलाबराव देवकरांचे नाव पुढे केले होते. देवकरांसारखा उमेदवार समोर असल्याने भाजपने सावध चाल करत आमदार स्मिता वाघ यांना जाहीर केलेली उमेदवारी शेवटच्या दिवशी कापून उन्मेष पाटलांच्या गळ्यात उमेदवारी टाकली होती. आमदार वाघ यांच्यापेक्षाही उन्मेष पाटील सोपे असल्याची मनोमन समजूत केल्याने देवकरांचा विजयाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यातच अमळनेरात भाजपच्या व्यासपीठावरील हाणामारी, शिवसैनिकांची नाराजी या बाबी चमत्कार करून आपला विजय सुकर करतील, असा आडाखा बांधून देवकर गाफिल राहिले.
अनुकूल असलेल्या वातावरणाचा देवकरांना लाभ उठवता आला नाही. म्हणूनच त्यांच्या वाट्याला पराभव आला. जळगाव मतदारसंघातील सर्व परिस्थिती भाजपच्या विरोधात असतानाही देवकरांची यंत्रणा अपयशी ठरली. भाजपमधील कलह पथ्यावर पडेल, यावरच देवकर विसंबून राहिले. आपली यंत्रणा आपल्यासोबत आहे किंवा नाही, याची त्यांनी खात्री केली नाही. शिवाय पक्षातीलत काहीजण भाजपला जाऊन मिळाल्याने देवकरांची पद्धतशीर नाकेबंदी झाली. दुसरीकडे देवकरांवर घरकुल घोटाळ्यासह विविध 5 प्रकरणांत आरोप असल्याने ते सत्ताधाऱ्यांविरोधात जाणार नाही, हा भाजपचा अंदाज खरा ठरला.
गेल्या 5 वर्षात जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विधानसभा, नगरपालिका, जळगाव महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी दूध संघ, तालुका देखरेख संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण केले आहे, त्याचा भाजपने फायदा करून घेतला. तसेच युतीमुळे सोबत असलेल्या शिवसेनेचेही मतदारसंघात चांगले प्रस्थ असल्याने उन्मेष पाटलांना अधिकची ताकद मिळाली.
विधानसभा मतदारसंघनिहायची खलबते-
- 1) जळगाव शहर
यावेळी भाजप-सेनेत युती झाल्याने शिवसेनेचे नेते सुरेश जैन हे थेट मैदानात उतरले. त्याचप्रमाणे भाजपचे महापालिकेतील 58 नगरसेवक, विद्यमान आमदार सुरेश भोळे, शिवसेनेच्या 15 नगरसेवकांनी उन्मेष पाटलांसाठी परिश्रम घेतले. यापेक्षा अगदी उलट परिस्थिती देवकरांची होती. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. संपूर्ण मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे देवकर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात बॅक फूटवर गेले.
- 2) जळगाव ग्रामीण
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा पराभव करीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी झाले होते. त्यानंतर धरणगाव नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली होती. सहकार राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गुलाबराव पाटलांनी जळगाव ग्रामीणमध्ये आपले थेट वर्चस्व प्रस्थापित केले.
या निवडणुकीत युती असल्याने उन्मेष पाटलांसाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. पुढे भाजप आपल्या मदतीला येईल, म्हणून त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. हा मतदारसंघ गुलाबराव देवकर यांचा हक्काचा मानला जातो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांची नस ओळखता न आल्याने देवकरांना या ठिकाणी छाप पाडता आली नाही. शिवसेनेची भूमिका या ठिकाणाहून भाजपसाठी महत्त्वाची ठरली.
- 3) अमळनेर
या विधानसभा मतदारसंघातून सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपला समर्थन दिले. तर माजी आमदार साहेबराव पाटील नगरपालिकेतील आघाडीच्या ताकदीने भाजपसोबत आले. शिवाय बाजार समिती, पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता असल्याने त्याचा भाजपला फायदा झाला. पक्षांतर्गत गटबाजीमुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ निवडणुकीपासून दूर राहिले, तरी त्याचा फारसा फरक भाजपला पडला नाही. तसेच प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पासाठी भरीव आश्वासन दिल्याने मतदार भाजपच्या पाठीशी राहिले. देवकरांच्या बाजूने केवळ जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील हे एकमात्र पाठबळ होते. ते फारसा जोर लावू शकले नाहीत.
- 4) पाचोरा-भडगाव
या ठिकाणी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पाचोरा आणि भडगाव नगरपालिका, बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तसेच पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजप वरचढ ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे राजकीय वर्तुळात काहीसे मागे पडले आहेत. त्यामुळे देवकरांना या ठिकाणी हवा तसा जोर लावता आला नाही.
- 5) चाळीसगाव
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांचा पराभव करीत भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील विजयी झाले होते. त्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समितीवर देखील भाजपने सत्ता मिळविली होती. चाळीसगाव हा मतदारसंघ उन्मेष पाटील आणि देवकरांचा मूळ घरचा मतदारसंघ आहे. मात्र, उन्मेष पाटील यांचे पारडे येथेही वरचढ ठरले. आमदार म्हणून केलेली विकासकामे, युवकांचे उत्तम संघटन आणि भाजपची साथ या बाबींमुळे उन्मेष पाटलांना येथून चांगला लीड मिळाला. राजीव देशमुख वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला कोणी आले नाही. त्यामुळे देवकर घरच्या मैदानावरही पिछाडीवर राहिले.
- 6) पारोळा-एरंडोल
पारोळा आणि एरंडोल नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समितीवर भाजप तसेच शिवसेनेची सत्ता असल्याने भाजपला आयती साथ मिळाली. सेनेतून भाजपमध्ये आलेले मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील जि.प. अध्यक्षा आहेत. त्यांच्यासह सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचे प्रयत्न उन्मेष पाटलांच्या कामी आले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी देवकरांसाठी चांगला जोर लावला पण मोदी फॅक्टरमुळे त्यांचे प्रयत्न कामी आले नाहीत. मावळते खासदार ए. टी. पाटील हे अलिप्त राहूनही भाजपला फरक पडला नाही.
- विधानसभा मतदारसंघ निहाय मिळालेली मते-
- जळगाव शहर - उन्मेष पाटील - 126655, गुलाबराव देवकर- 55265
- जळगाव ग्रामीण - उन्मेष पाटील- 121664, गुलाबराव देवकर-57024
- अमळनेर - उन्मेष पाटील- 103747, गुलाबराव देवकर - 42913
- पारोळा-एरंडोल - उन्मेष पाटील 115007, गुलाबराव देवकर - 41703
- चाळीसगाव - उन्मेष पाटील 121118, गुलाबराव देवकर -58900
- भडगाव-पाचोरा - उन्मेष पाटील 120548, गुलाबराव देवकर- 45435